■ नशेच्या आहारी गेलेल्या २० वर्षीय युवकाचे अमानुष कृत्य
परळी (प्रतिनिधी) —
परळी शहरातील तलाव कट्टा (फुलेनगर) परिसरात शनिवारी (दि. ९ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक हृदयद्रावक व धक्कादायक घटना घडली. नशेच्या आहारी गेलेल्या २० वर्षीय नातवाने पैशासाठी स्वतःच्या ८० वर्षीय आजीवर धारदार सत्तूरने जीवघेणा हल्ला केला. या भयंकर घटनेत आजीची प्रकृती मरणासन्न झाली असून, त्यांना वाचविण्यास धावून आलेल्या आई-वडिलांनाही आरोपीने गंभीर जखमी केले. पोलिसांनी केवळ १५ मिनिटांत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.
घटनेची सविस्तर माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, तलाव कट्टा (फुलेनगर) येथील कुरेशी कुटुंबात शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली.
जुबेदा इब्राहिम कुरेशी (वय ८०) घरी एकट्या होत्या. त्यांचा नातू आरबाज रमजान कुरेशी (वय २०) हा नशेत चूर अवस्थेत घरी आला आणि आजीकडे पैशाची मागणी करू लागला.
पैसे देण्यास आजीने नकार दिल्यावर संतप्त झालेल्या आरबाजने हातातील धारदार सत्तूरने थेट त्यांच्या चेहऱ्यावर व डोक्यावर वार केले. या हल्ल्यात आजी गंभीर जखमी होऊन मरणासन्न अवस्थेत कोसळल्या.
मायबापांवरही निर्दयी हल्ला
दरम्यान, ओरड ऐकून घरात आलेले आरोपीचे आई समिना रमजान कुरेशी आणि वडील रमजान इब्राहिम कुरेशी यांनी आरबाजला आवर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांच्यावरही सत्तूरने वार करत दोघांनाही गंभीर जखमी केले. त्यानंतर आरबाज शस्त्र हातात घेऊन घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न करीत होता.
पोलिसांची धाडसी कारवाई
घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे आणि त्यांचा पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन केवळ १५ मिनिटांत आरोपीला जिवंत शस्त्रासह शिताफीने ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे, आरोपीकडे धारदार सत्तूर असूनही पोलिसांनी धाडस दाखवत कोणताही अपघात होऊ न देता कारवाई पूर्ण केली.
जखमींवर उपचार सुरू
गंभीर जखमी आजीला अंबाजोगाई येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आई-वडिलांवरही प्राथमिक उपचारांनंतर अंबाजोगाईतच पुढील उपचार सुरू आहेत.
या घटनेने तलाव कट्टा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. अद्याप आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.