प्रतिनिधी – एरंडोल येथे हिंदू-मुस्लिम एकतेची परंपरा जपणारा नथ्थूबापू उरूस आजपासून सुरू झाला. शतकभराच्या वारशाला लाभलेली ही यात्रा दरवर्षीप्रमाणे भाविकांच्या गर्दीने उजळली असून, मनोकामना पूर्णत्वासाठी कापडी घोडा व चादर चढविण्याची प्रथा यावर्षीही भाविकांमध्ये उत्साहाने पाळली जात आहे.
यात्रेच्या निमित्ताने उंच पाळणे, मौत का कुंवा, धडकगाडी, गगनचुंबी खेळ आदी आकर्षणे दाखल झाली आहेत. महिलांसाठी लाटणे, पोळपाट, चाळण्या अशा गृहोपयोगी वस्तूंची खरेदी आणि खवय्यांसाठी गुळाची जिलेबी, भजीचा सुगंध यात्रेला रंगत आणत आहे.
मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही सट्टा-पत्ता, जुगार आणि फसवणुकीचे खेळ उघड्यावर सुरू होऊ नयेत, अशी जोरदार मागणी महिलांसह नागरिकांनी केली आहे. यात्रेसाठी आणलेले पैसे फसव्या खेळांत हरवून लहान मुले उपाशी घरी परततात, ही खंतही व्यक्त करण्यात आली. अशा प्रकारांना आळा बसावा आणि यावर्षीची यात्रा स्वच्छ, सुरक्षित राहावी यासाठी शांतता समितीची बैठक तातडीने घेण्याची मागणी काही सदस्यांनी केली आहे.


