एरंडोल — शास्त्री फार्मसी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय शास्त्री तर सचिव सौ. रूपा शास्त्री उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुप कुलकर्णी यांनी केले. उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या स्वागतपर भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणविषयक विचारांचा उल्लेख करून विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य आणि संशोधनाकडे सातत्याने वाटचाल करण्याचे प्रेरणादायी आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी विद्यार्थ्यांना कंफर्ट झोनमधून बाहेर पडून स्पर्धात्मक जगाचा सामना करण्याची क्षमता विकसित करण्याचा सल्ला दिला. “आज घेतलेले कष्ट उद्याचे भविष्य उज्ज्वल घडवतात,” असे ते म्हणाले.
यानंतर विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रेझेंटेशन, निबंध स्पर्धा, क्विझ स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवकल्पना, विज्ञान आणि सामाजिक जाणिवांवर आधारित विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाबाबत अभिप्राय संकलित करण्यात आला. त्या आधारे आगामी शैक्षणिक वर्षात शैक्षणिक प्रगती अधिक गतीमान करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाची सांगता प्रा. अनुप कुलकर्णी यांच्या आभारप्रदर्शनाने झाली. संपूर्ण आयोजनात प्रा. जावेद शेख यांच्यासह सर्व प्राध्यापकवृंदांचे मोलाचे सहकार्य लाभले. शास्त्री फार्मसी महाविद्यालयाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरला.



