९४.३ माय एफएमकडून ग्रामीण शिक्षण व सामाजिक योगदानाची दखल.
एरंडोल येथील शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला ९४.३ माय एफएमतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘व्हिजनरी ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी (आयपीएस) यांच्या शुभहस्ते संस्थेचे संस्थापक डॉ. विजय शास्त्री व सौ. रूपा शास्त्री यांनी पुरस्कार स्वीकारला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी अल्पावधीत राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे संस्थेने वेगळी ओळख निर्माण केली आहे. शैक्षणिक क्षेत्रासोबतच सामाजिक व सांस्कृतिक कार्यात दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानामुळे हा गौरव मिळाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना हा सन्मान समाजासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांची पावती असल्याचे सांगत, विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संकल्प कायम राहील, असे डॉ. विजय शास्त्री यांनी व्यक्त केले. या गौरवाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून जळगाव जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.


