shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुंबई फाईल्स .., जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीपूर्तीचा हा दिवस! अशावेळी पहिल्याप्रथम बाळासाहेब यांच्या नावाचा वापर करणाऱ्या त्यांच्या नकली शिष्यांपासून आणि नकली दोस्तांपासून असली शिवसैनिकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या कोणत्याही फसव्या युक्तिवादास आणि लबाडीस बळी पडता कामा नये. सामान्य मतदारांनाही हेच आवाहन आहे.


'आम्ही बाळासाहेबांचे मर्द मावळे' असे म्हणणाऱ्या शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे मारहाण प्रकरणात कित्येक दिवस फरारी होते. शेवटी त्यांना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे लागले. तेव्हादेखील ते महाड पोलीस ठाण्याच्या मागच्या दाराने आत गेले. हे यांचे शौर्य! अशांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार तरी आहे का? 

बदलापूरमध्ये एका चिमुकलीवर पुन्हा अत्याचार झाला आहे. आज बाळासाहेब असते, तर सरकारची पाठ सोलून काढली असती! प्रदूषण प्रकरणी न्यायालयाने नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा पगार रोखण्याचा आदेश दिला आहे. उद्या अशीच कारवाई मुंबई महानगरपालिका आयुक्तांवर करावी लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.  महायुतीचे हे 'सर्वसामान्यांचे सरकार' असल्याचा दावा करणारे लाडके भाऊ काय करत आहेत? इथल्या प्रदूषणाच्या कीर्तीचा 'परिमळ' दावोसपर्यंत गेला नसेल, असे देवाभाऊला वाटते का? बाळासाहेबांना पर्यावरणाबद्दलदेखील आस्था होती. थोडक्यात बाळासाहेबांचे नावही घेण्याचा यांना अधिकार नाही..

बाळासाहेबांनी १९८९ मध्ये भाजपशी युती केली. त्यात प्रमोद महाजन यांची भाजपच्या वतीने महत्त्वपूर्ण भूमिका होती. १९८९ मधील लोकसभा आणि १९९० च्या विधानसभा निवडणुका दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढल्या. परंतु दोन वर्षानंतरच भाजप-शिवसेना युतीत फूट पडली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला होता. शिवसेनेला अधिक जागा हव्या असल्याने, दोघांनी युती तोडली. बाळासाहेबांनी ज्याप्रमाणे स्वाभिमान दाखवला, त्याचप्रमाणे २०१९ मध्ये उद्धवजींनी स्वाभिमान दाखवला होता, हे लक्षात घेतले पाहिजे. 'उद्धवजींनी जनादेशाचा अवमान केला' असे म्हणणार्‍यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, जनतेने उभय पक्षांना एकमेकांना सांभाळून काम करण्यासाठीच हे मतदान केले होते. परंतु भाजपने दिलेला शब्द फिरवल्यामुळे आणि युतीत फसवाफसवी केल्यामुळेच उद्धवजींना भाजपला लाथाडणे भाग पडले. ही गोष्ट लाचार सेनेचे नेते कधीच करू शकणार नाहीत. शिवाय उद्धवजींवर आरोप करण्यापूर्वी, प्रथम देवेंद्रजींनी 'जनादेशाचा अवमान करून" अजितदादांबरोबर भ्रष्टवादी  सरकार स्थापन करून मतीचे बारा वाजल्याचा प्रत्यय लोकांना घडवला, हे विसरू नये. १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजप- शिवसेनेने एकत्रितपणे सरकार स्थापन केले. मात्र सर्वाधिक जागा जिंकलेल्या काँग्रेसला तेव्हा विरोधी पक्षात उभे राहावे लागले होते! निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेची युती नव्हती, पण निकालामुळे दोघांनाही सरकार स्थापन करण्यास भाग पडले होते... वाजपेयी सरकारमध्ये शिवसेनेचे दोन खासदार कॅबिनेट मंत्री झाले आणि एक राज्यमंत्री झाला. तेव्हा महाराष्ट्रातील युती दिल्लीच्या राजनीतीमध्येही दिसून आली. कारण त्यावेळी केंद्रात सत्तेवर वाजपेयी होते, मोदी नव्हते! सरकारमध्ये असतानाही शिवसेना भाजपविरोधात भूमिका घेत होती. बाळासाहेब राम मंदिर, ३७० वे कलम अशा अनेक मुद्द्यांवर भाजपवर टीका करत होते. बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी २०१४ ते २०१९ मध्ये देखील युती सरकारमध्ये राहून, राम मंदिरासारख्या अनेक मुद्द्यांवर भाजपवर तोफ टाकण्याचे धाडस दाखवले होते. १९९९मध्ये झालेल्या विधानसभा निकालानंतर तेरा दिवस भाजप-शिवसेनेत सरकार स्थापनेची बोलणी सुरू होती. याचा लाभ राष्ट्रवादी व काँग्रेसने उचलला. त्यावेळी शिवसेनेला ६९ जागा आणि भाजपाला ५६ जागा मिळाल्या होत्या. भाजपला गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री बनवायचे होते. या गोष्टीस शिवसेना राजी नव्हती. म्हणजे तेव्हा देखील दोन्ही पक्षांत मतभेद होते. मात्र म्हणून एक पक्ष सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांमागे तपास यंत्रणा लावत नव्हता.. 

२००४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ५४ आणि शिवसेनेला ६२ जागा मिळाल्या होत्या. तर २००९ मध्ये भाजपाला ४६ जागा व  शिवसेनेला ४४ जागावर विजय मिळाला होता. २०१४ मध्ये दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. निवडणुकीनंतरच्या निकालाने या दोघांना एकत्र आणले. तरीही २०१८ पर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती होण्याची शक्यता फेटाळली होती.

परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये आश्चर्यकारक युती झाली आणि दोन्ही पक्षांनी एकत्रपणे लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी अमित शहा यांना 'मातोश्री'वर यावे लागले होते. असो.
     बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील आपल्या प्रेमाचे प्रदर्शन गोहाटी गॅंगने आज पुन्हा घडवले. गोहाटी रिटर्न्ड मंडळींवर तेव्हा टीका करणाऱ्या काही नेत्या ( 'मर्सिडीज फेम'सह) याच टोळीत नंतरच्या टप्प्यात स्वतःच्या सोयीनुसार सामील झाल्या. 'महाराष्ट्रात फक्त एकच ब्रँड आहे, तो म्हणजे बाळासाहेब!' असे वारंवार सांगून, अप्रत्यक्षपणे उद्धव आणि राज म्हणजे ब्रँड नाहीत, हे अधोरेखित करण्यात देवेंद्रजींना परमानंद होत असतो.. भाजपचा पूर्वावतार म्हणजे जनसंघ. १९६६ साली बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर, मराठी माणसाच्या हिताचे कार्य त्यांनी सुरू केले. बाळासाहेबांवरच्या प्रेमाचे नाटक करणाऱ्या लोकांनी, म्हणजेच संघ-जनसंघाने बाळासाहेबांच्या या कार्यात खांद्याला खांदा लावून काम केल्याचे आठवते का? 
      जनता पक्षात असताना जनसंघवाल्यांनी रा. स्व. संघाशी असलेले संबंध तोडले नाहीत आणि ते दुहेरी सदस्यत्वाची ढोलकी वाजवत बसले. अमित साटम वगैरे मंडळींना भाजपचा देखील वारसा कितपत माहिती आहे, ते ठाऊक नाही! 'मुंबईचा महापौर खान होईल' वगैरे चर्चा त्यांनी सुरू केली होती. ज्यावेळी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर १९८० च्या एप्रिल महिन्यात भाजपच्या स्थापनेची घोषणा झाली, तेव्हा वाजपेयी यांना अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. लालकृष्ण अडवाणी आणि सूरजभान यांच्याबरोबर सिकंदर बख्त यांनाही पक्षाचे महासचिव हे मोठे पद देण्यात आले. बाय द वे, बख्त हे मुस्लिमधर्मीय होते. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाला ३१ व जनसंघाला १६ जागा मिळाल्या. जनसंघ हा जनता पक्षात विलीन झाला होता. जनसंघाचे जे सदस्य निवडून आले होते, त्यांनी खरा जनता पक्ष आमचाच असल्याचा दावा सुरू करण्यास सुरुवात केली. परंतु जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी जनसंघाशी जोडलेल्या नेत्यांना निवडणूक आयोगात आव्हान दिले.  त्यावेळी आयोग हा पूर्ण वेळ सरकारच्या घरगड्याचे काम करत नव्हता! तेव्हा आयोगाने भाजपला थेट राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला होता. हाती नांगरधारी शेतकरी या जनता पक्षाच्या चिन्हावर आयोगाने तात्पुरती बंदी घातली होती. आयोगाने भाजपला कमळ हे चिन्ह दिले. खरे तर भाजपला चक्र आणि हत्ती असलेले चिन्ह हवे होते. तसा प्रस्ताव त्यांनी मांडला, पण तो आयोगाने स्वीकारला नाही. चंद्रशेखर यांनी आयोगाकडे निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. सहा महिन्यानंतर आयोगाने चंद्रशेखर यांची विनंती मान्य करत, नांगरधारी शेतकरी निवडणूक चिन्हावरची बंदी उठवली होती. आज शिवसेनेच्या चिन्हाचा वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे! 
      निवडणूक आयोगाने भाजपचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मात्र कायम ठेवला. पुढे सिकंदर बख्त त्यांना पक्षाचे अध्यक्ष करावे, अशी वाजपेयींनी सूचना केली आणि त्यास शेखावत यांनी समर्थन दिले, होते हेही महत्त्वाचे. वाजपेयींचा वारसा हा होता. मला आठवते, भाजपचे पहिले अधिवेशन डिसेंबर १९८० मध्ये मुंबईत वांद्रे रेक्लमेशन मैदानावर झाले होते. त्यात चाळीसेक हजार लोकांची राहण्या-जेवण्याची व्यवस्था होती. पण त्यापेक्षा जास्त लोकांनी हजेरी लावली, तेव्हा काही पक्षाच्या सदस्यांनी तरी बाहेर जेवून यावे, अशी विनंती अडवाणींना करावी लागली. पक्षात तेव्हा केवढा साधेपणा होता... 
       त्या अधिवेशनात पक्षाने 'गांधीवादी समाजवादा'ची घोषणा दिली. त्यास विजयाराजे सिंधिया यांचा विरोध होता. कारण  इंदिरा गांधींच्या समाजवादामुळे संस्थाने खालसा झाली, याचा राग विजयाराजे यांना होता! मुळात समाजवादालाच संघवाल्यांचा तीव्र विरोध होता... परंतु वाजपेयींच्या आग्रहास्तव गांधीवादी समाजवादाची विचारधारा स्वीकारण्यात आली होती. ३० डिसेंबर १९८० च्या रात्री केलेल्या भाषणात वाजपेयींनी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा सिद्धांत स्वीकारला आहे आणि आम्ही सकारात्मक धर्मनिरपेक्षता पाळणार आहोत, असेही घोषित केले होते. आज मोदी, शहा व फडणवीस यांना या शब्दाचीच ॲलर्जी आहे! आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना बंदिवासात ठेवण्यात आले होते, तेव्हा त्यांचा एक सेवक मुस्लिम होता. १६६१ मध्ये महाराजांनी आपली कोकण मोहीम केळशीच्या  याकुतबाबा या मुस्लिम संतांच्या आशीर्वादाने सुरू केली होती, याचा उल्लेखही वाजपेयींनी आपल्या वांद्रे येथील भाषणात केला होता. आज वांद्रे येथेच राहणारे उद्धवजी हे सर्व जाती धर्मांना एका सूत्रात बांधणाऱ्या धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करतात, तेव्हा मात्र भाजप आणि त्यांचे ताबेदार असलेले शिंदेसेना त्यांच्यावर तोंडसुख घेत असते!
      मुंबईतील त्या अधिवेशनात नेहरू आणि इंदिरा गांधींच्या कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून काम केलेले एम. सी. छागला हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी त्यांनी मोहम्मद अली जिना यांचे सहाय्यक म्हणूनही काम केले होते. जीना है राष्ट्रवादी होते, तोपर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. मात्र जसजसे ते सांप्रदायिक होत गेले,  देशाच्या फाळणीबद्दल बोलू लागले, तसतसे त्यांचे आणि माझे रस्ते वेगळे होत गेले, असा उल्लेख छागला यांनी आपल्या 'रोझेस इन डिसेंबर' या पुस्तकात केला आहे. वाजपेयी हे उद्या भारताचे पंतप्रधान होणार आहेत, असे उद्गार छागला यांनी त्यावेळी काढले होते. 
      भाजपच्या मुंबई  येथील पहिल्या अधिवेशनासाठी नसली वाडिया यांनी आर्थिक मदत केली होती. वाडिया हे १९७० च्या दशकात जनसंघाला आणि नंतर भाजपला अर्थसहाय्य करत होते. वाडिया हे जिना यांचे नातू आहेत बरें!  तरीदेखील तेव्हाचा भाजप आणि आजचा भाजप याच्यात खूप फरक आहे. तेव्हाचा भाजप आजच्यासारखा लोकशाहीविरोधी आणि विद्वेषी नव्हता. आणि भाजपचे तेव्हाचे अनेक नेते हे इव्हेंटबाज नव्हते. ते साधे होते. वाजपेयी यांनी मोदींना राजधर्म पाळण्यास सांगितले, ही गोष्ट मोदींना आवडली नव्हती. आणि तेव्हाच त्यांनी काहीतरी लटका युक्तिवाद केला होता. ज्या अडवाणींनी त्यांना वाचवले, त्यांनाच समृद्ध अडगळीत टाकून, मोदी हे फक्त त्यांच्या वाढदिवशी अडवाणींकडे जातात आणि वरवरचा आदर व्यक्त करतात.
      वाजपेयींच्या निधनानंतर मोदी यांनी  त्यांच्या अंत्ययात्रेत पायी चालत जात, आपल्या वाजपेयीप्रेमाचे नाटक केले. परंतु प्रत्यक्षात वाजपेयींच्या जवळच्या माणसांचा त्यांनी परफेक्ट कार्यक्रम केला! 
    आज बाळासाहेब ठाकरे यांची भक्तिगीते गाणारे अनेक भाजपवाले आणि सगळेच्या सगळे शिंदेसेनेवाले हे या मोदींच्या ढोंगी पंथातीलच आहेत!
close