उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना शिर्डीत उजाळा; शोकसभेत मान्यवर गहिवरले
शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर शुक्रवारी (दि. ३०) सकाळी शिर्डी नगरपरिषद कार्यालयात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, नगरसेवक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीकडे जात असताना झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार, दोन पायलट, फ्लाईट अटेंडंट आणि सुरक्षा अधिकारी अशा पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिर्डी नगरपरिषदेचे नगरसेवक आणि ग्रामस्थांच्या वतीने नगरपरिषद कार्यालयात ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
या शोकसभेत अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, मुख्याधिकारी सतीश दिघे, शिर्डी प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते, डॉ. एकनाथ गोंदकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र गोंदकर, ॲड. शिवाजीराव कोते, राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर, बाबासाहेब कोते, शिवाजी गोंदकर, नगरसेवक निलेश कोते, महेंद्र शेळके, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सचिन कोते, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले, सचिन तांबे, प्रमोद गोंदकर, ॲड. अनिल शेजवळ, डॉ. नीचिकेत वर्पे, गफ्फार पठाण, राकेश कोते आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष व स्वच्छता आरोग्य सभापती दीपक गोंदकर, नगरसेवक अमित शेळके, नगरसेविका सौ. अलका गोतीस, गणेश गोंदकर, निलेश शिंदे, अमोल सुपेकर, अजित जगताप तसेच शिर्डी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सदस्य, छत्रपती शासन, युवा शिर्डी ग्रामस्थ आणि शंभुराजे प्रतिष्ठानसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमेश गोंदकरांना अश्रू अनावर
शोकसभेत राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. पवार साहेब आणि आपल्या कुटुंबाचे एक अतूट नाते कसे होते, याबद्दलच्या भावना व्यक्त करत असताना रमेश गोंदकर यांना अचानक अश्रू अनावर झाले. उपस्थितांनी जड अंत:करणाने आपल्या नेत्याला निरोप दिला.

