ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, उल्हासनगर यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची बिनविरोध निवड झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते स्वीकृत नगरसेवक पदाकडे. स्विकृत नगरसेवक म्हणजे महापालिकेतील संख्या बळाच्या आधारे प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांनी निवडून द्यायचे प्रतिनिधी. त्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणू शकत नाही.कारण त्यांना लोकांनी निवडून दिलेले नाही तर पक्षांनी त्यांना उपकृत केल्यामुळे ते स्वीकृत नगरसेवक होतात.
महानगरपालिका अधिनियमात स्विकृत नगरसेवक पदासाठी अनेक अटी व शर्ती आहेत. त्या निकषानुसार जर स्वीकृत नगरसेवक निवडायचे झाले तर ज्यांचे राजकीय पुनर्वसन करायचे आहे,असा एकही व्यक्ती होऊ स्विकृत नगससेवक होऊ शकणार नाही. डॉक्टर, वकील, आर्किटेक, महापालिकेतील अनुभवी सेवानिवृत्त अधिकारी व विविध विषयातील तज्ञ व्यक्ती स्विकृत नगरसेवक झाले पाहिजेत, असे निकष आहेत. परंतु या सर्व निकषांना बासनात गुंडाळून राजकीय पक्ष आपापल्या लोकांना या पदासाठी निवडतात.त्यामुळे स्विकृत नगरसेवक नेमण्या मागचा जो उद्देश आहे, त्याला हरताळ फासली जाते.जे धनाढ्य लोक आहेत व निवडणूक लढवण्याच्या भानगडीत पडू इच्छित नाहीत, ते आपल्या धनशक्तीच्या जोरावर असे आयते नगरसेवक पद मिळवतात, हे आपण अनेक वेळा अनुभवले आहे.
स्विकृत नगरसेवक पदासाठी शासनाने आपल्या नियमात एका अधिसूचनेनुसार बदल केलेला असून पूर्वी कमाल पाच नगरसेवक स्वीकृत करता येत होते. त्यांची संख्या वाढवून एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के इतके नगरसेवक स्वीकृत करता येतात.मात्र कमाल मर्यादा दहा आहे. या कायद्यानुसार उल्हासनगर महानगरपालिकेचे 78 सदस्य असल्याने ते आठ स्वीकृत नगरसेवक निवडू शकतात.
या सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवक पदासाठी 25 लाखापासून एक कोटी पर्यंत खर्च करणारे अनेक नगरसेवक आहेत. त्यामुळे स्विकृत नगरसेवक पदासाठी सध्या घोडेबाजार सुरू आहे. जो जास्तीत जास्त बोली लावेल, त्यालाच स्विकृत नगरसेवक पदाची लॉटरी लागेल. एका सूत्राच्या अनुसार सध्या स्विकृत नगरसेवक पदासाठी एक कोटी ते दोन कोटीची बोली लावली जात आहे. आता जे एक किंवा दोन कोटी देऊ शकतील,असे स्विकृत नगरसेवक महापालिकेत समाजसेवा करण्यासाठी मुळीच येणार नाहीत, ते एकतर आपले अवैध धंदे लपवण्यासाठी किंवा त्यास राजकीय संरक्षण मिळवण्यासाठी येतील. किंवा जे बांधकाम व्यवसायिक आहेत ते आपल्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण मिळावे व कारवाई पासून बचाव व्हावा, यासाठी ही बोली लावू शकतात. अश्या परिस्थितीत ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, निवडणूक असो किंवा इतर प्रसंगी पक्ष कार्यासाठी झोकून दिले, असे कार्यकर्ते मात्र वंचित राहतील. मग त्यांना न्याय कोण देणार ? याचे उत्तर एकच आहे की, निष्ठावंत कार्यकर्ता हा कडीपत्त्यासारखा वापरून फेकून द्यायचा असतो. पुढच्या निवडणुकीपर्यंत त्याची गरज भासत नाही. त्यामुळे त्यामुळे असे कार्यकर्ते निरोपयोगी ठरतात.
मी स्विकृत नगरसेवक पदाच्या इच्छुकांची पाहणी केली असता स्विकृत नगरसेवक पदासाठी कमीत कमी 20 लोक इच्छुक आहेत. यापैकी अनेकांना निवडणुकीपूर्वी खासदारांनी व त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी स्विकृत नगरसेवक करण्याचा शब्द दिला होता. उदाहरणच द्यायचे झाले तर प्रभाग क्रमांक 15 मध्ये निलेश बोबडे या भाजपच्या कार्यकर्त्याला निवडणुकीपासून परावृत्त करण्यासाठी व अरुण आशान यांच्या नेतृत्वाखाली पॅनल निवडून आणण्यासाठी स्विकृत नगरसेवक पदाचे आश्वासन देण्यात आले होते. प्रभाग 13 मध्ये उमेदवारी नाकारलेले व प्रभाग 17 मधून पराभूत झालेले रमेश चव्हाण यांना देखील स्विकृत नगरसेवक पदाचे आश्वासन देण्यात आले होते.
त्यानंतर श्रीमती जया साधवाणी, श्रीमती पंचम कलानी,डॉक्टर नाथांनी हे देखील स्विकृत नगरसेवक पदाच्या रेस मध्ये आहेत. त्यात आता निवडणूक लढवून पराभूत झालेल्या काही उमेदवारांचा स्विकृत नगरसेवक पदावर डोळा आहे. संख्या बळाच्या प्रमाणात विचार केला तर शिवसेना शिंदे व वंचित आघाडी मिळवून पाच स्वीकृत नगरसेवक निवडून आणू शकतात तर भाजपा तीन स्विकृत नगरसेवक निवडून आणू शकते. भाजपाकडेही स्विकृत नगरसेवक पदासाठी रीघ लागलेली आहे. त्यात प्रभाग क्रमांक 15 मधून पराभूत झालेले भाजपाचे व पूर्वीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे हे देखील गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. याशिवाय श्री नरेंद्र राजानी यांच्या नावाला देखील मूळ भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे.
तसेच भाजपचे परमनंट स्वीकृत नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांची वर्णी लागणे निश्चित आहे. याशिवाय भाजपने ज्यांना उमेदवारी नाकारली व स्विकृत नगरसेवक पदाचे आश्वासन दिले असे अनेक कार्यकर्ते आहेत.
याशिवाय अनेक थैलीशाह आपल्या थैल्या मोकळ्या सोडण्यास सज्ज झालेले आहेत. कोटी, दोन कोटी ही रक्कम ज्यांना नगण्य वाटते, असे वाईन सम्राट, भू माफिया, डान्सबार मालक- चालक, छुपे ठेकेदार हे सर्व जय्यत तयारीत आहेत. यापैकी जे जास्त बोली लावतील त्याच्या पदरात स्वीकृत नगरसेवक पद पडेल. काही दिवस हे नगरसेवक पदाचे घोंगडे भिजत राहील व अचानक व अनपेक्षितरित्या काही नावे पुढे येतील. उल्हासनगरच्या राजकारणात काहीही घडू शकते, हे आपण वेळोवेळी पाहिले आहे. त्यामुळे स्विकृत नगरसेवक कोण होईल व कोणाचा पत्ता कट होईल? हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येणार नाही.

