नगरसेवक सुधीर शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार; माणुसकी जपणाऱ्या या निस्वार्थी कृतीची संपूर्ण शहरात रंगलीये चर्चा!
नगर प्रतिनिधी:
श्री साईबाबांच्या दर्शन रांगेजवळ एका हताश भक्ताचे हरवलेले पैशांचे आणि महत्त्वाच्या कागदपत्रांचे पाकीट मूळ मालकाला सुखरूप परत करत, 'साईश्रद्धा प्रतिष्ठान'चे संस्थापक व अध्यक्ष संजय महाजन सर यांनी प्रामाणिकपणाचा मोठा आदर्श उभा केला आहे. त्यांच्या या निस्वार्थी कृतीबद्दल संत सावता महाराज मंदिरात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
त्यांच्या या स्तुत्य आणि प्रामाणिक कार्याची दखल घेत, भारतीय जनता पार्टीचे शिर्डी शहराध्यक्ष आणि संत सावता महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री. सुधीर शिंदे यांच्या हस्ते सावता महाराज मंदिरात शाल व फुलांचा मोठा हार देऊन महाजन यांचा यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवर श्री. सुनील सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाबांच्या दरबारात कोणीच रित्या हाताने जात नाही, हा विश्वास संजय महाजन यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सार्थ ठरवला आहे. त्यांच्या या कृतीने संपूर्ण शिर्डीचा लौकिक वाढवला असून, सध्या शहरात त्यांच्या या प्रामाणिकपणाची सर्वत्र चर्चा आणि कौतुक होत आहे.

