मुंबई | प्रतिनिधी
भारतीय लोकशाहीच्या प्रदीर्घ वाटचालीत ज्येष्ठ नेते Sharad Pawar यांचे योगदान म्हणजे एक तेजस्वी पर्वच! तब्बल साठ वर्षांचा त्यांचा संसदीय प्रवास हा केवळ राजकीय कारकिर्दीचा आलेख नसून जनतेशी जपलेल्या नात्याचा अढळ विश्वास आहे, अशा शब्दांत खासदार Nilesh Lanke यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
१९६७ साली प्रथमच शपथ घेत लोकसेवेच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या पवार साहेबांनी प्रत्येक दशकात नवे आदर्श निर्माण केले. सहा वेळा महाराष्ट्र विधानसभेत, एकदा विधानपरिषदेत, सात वेळा लोकसभेत आणि दोन वेळा राज्यसभेत प्रतिनिधित्व करत त्यांनी अनुभव, दृष्टी आणि नेतृत्वाचा अद्वितीय संगम घडवला.
खासदार लंके म्हणाले, “साहेबांचा संसदीय प्रवास म्हणजे संघर्षातून उभारी घेण्याचा आदर्श धडा आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीतही त्यांनी ध्येयवादाची पताका कधी खाली येऊ दिली नाही. शेतकरी, कष्टकरी, तरुणाई आणि सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्ते आणि नेते घडले.”
ते पुढे म्हणाले, “साहेबांच्या छत्रछायेखाली आमदार आणि खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळणे, हे माझ्यासाठी आयुष्यभर जपण्यासारखे भाग्य आहे. त्यांच्या सहवासात राजकारण म्हणजे समाजसेवेची साधना आहे, हा मूलमंत्र शिकायला मिळाला.”
सहा दशकांचा हा प्रदीर्घ प्रवास म्हणजे लोकशाहीचा ‘दीपस्तंभ’ असल्याचे नमूद करत लंके यांनी पवार साहेबांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.
“साहेबांच्या नेतृत्वाची प्रकाशरेषा अशीच तेजोमय राहो आणि महाराष्ट्रासह देशाला दिशा देत राहो, हीच मनापासून प्रार्थना,” अशा शब्दांत खासदार निलेश लंके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

