वाळकी प्रतिनिधी(दादासाहेब आगळे): अहिल्या नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे गुंडेगावकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. एक दुरुस्ती केली की दुसऱ्या दुरुस्तीच्या प्रकाराने वीज कर्मचारी वैतागले आहेत तसेच महावितरण विभागातील व्यवस्थापनाबद्दल सर्वत्र असंतोष पहायला मिळत असताना दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर वीज जनमित्र विनोद सकट हे वेळोवेळी रात्रीचे उशिरापर्यंत धडपड करुन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने गुंडेगाव येथील प्रकाशदूत ठरले आहेत.
गेल्या काही दिवसापासून गुंडेगाव वीज वाहिन्या तुटून पडणे व अन्य तांत्रिक बिघाडाचे प्रकार वाढले होते. थोडीफार शांतता होऊन वीज पुरवठा सुरळीत होत नाही तर दुसरे संकट आ वासून उभे असेच एक संकट बुधवारी मध्यरात्री उभे राहिले.गुंडेगाव येथील हराळमळा,कुताळमळाकडे येणाऱ्या मुख्य वाहिनीवर अडचण निर्माण झाली व वीजपुरवठा खंडित झाल्याने दीर्घकाळासाठी या भागातील वीज पुरवठा खंडित झाला.अशावेळी येथील नागरिकांनी गावातील जनमित्र विनोद सकट यांना फोन करून माहिती दिली असता लागलीच सकट हे वेळेचा विचार न करता नेमका दोष शोधण्यासाठी शेताशेतात रान तुडवीत वीजपुरवठा सुरळीत करुन देण्यासाठी गेले व वीजपुरवठा सुरळीत सुरू करुन दिला.यावेळी या प्रकाशदूतानी काम फत्ते झाल्याचा सुस्कारा सोडला.यातच कायम वीज कर्मचारी व अधिकारी नागरिकांच्या रोषाला कायमच सामोरे जात असल्याचे आपण पहात असतो परंतु या प्रकाशदूताची कामगिरीमुळे चमकदार बनली आहे.
महावितरणचे प्रकाशदूत ग्राहकांना अहोरात्र, सेवा देतात.रात्रीच्या वेळेस होणाऱ्या विद्युत पोल वरील तांत्रिक बिघाडामुळे वीजप्रवाहात अडथळा निर्माण होतो.आमची सगळी यंत्रणा दिवस-रात्र निरंतर याच कामात लागलेली असते.वीजेच्या तारांशी त्यांची मैत्री असल्यासारखे ते काम करत असतात.
उमाकांत सपकाळे - उपकार्यकारी अभियंता, अहिल्या नगर.

