shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्जत नगरपंचायत कचरा गाडीच्या वाहनचालकाची मनमानी; प्रशासनाचे दुर्लक्ष..,नागरिक संतप्त – प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा..!

कर्जत : प्रतिनिधी
कर्जत नगर पंचायत हद्दीतील स्वामी समर्थ मंदिर (पाण्याची टाकी परिसर) तसेच आसपासच्या भागात कचरा संकलन सेवेतील गंभीर अनियमिततेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. कचरा गाडी अनेक दिवसांपासून परिसरात थांबत नसून केवळ वेगाने येऊन चक्कर मारून निघून जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

वाहनचालकांची उडवाउडवी; फोन कॉललाही प्रतिसाद नाही
परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, वाहनचालकाला जाब विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कॉल न उचलणे किंवा दिशाभूल करणारी माहिती देणे, असा प्रकार सातत्याने घडत आहे. या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

कचरा साचल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर
नियमित कचरा न उचलल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून घरांमध्ये अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणे ही गंभीर बाब असून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्तव्यातील ही मोठी त्रुटी असल्याचे मत नागरिकांनी मांडले.

अनेक वर्षांपासून समस्या कायम
ही समस्या नवीन नसून अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “आज सुधारणा होईल, उद्या सुधारणा होईल” या आशेवर नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संयम राखला; मात्र परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने आता संताप उफाळून आला आहे.

कायदेशीर जबाबदारीचा प्रश्न
महाराष्ट्र नगरपंचायत/नगरपरिषद कायदा तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार नगर पंचायतला नियमित व शिस्तबद्ध कचरा संकलन सेवा देणे बंधनकारक आहे. या कर्तव्यातील हलगर्जीपणा हा नागरिकांच्या आरोग्य व मूलभूत हक्कांवर गदा आणणारा असल्याचे मत व्यक्त होत आहे. संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी करून शिस्तभंग कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

तातडीने कारवाईची मागणी; अन्यथा मोर्चा
नगरसेवक व नगराध्यक्षांनी तातडीने लक्ष घालून नियमित कचरा संकलन व्यवस्था सुरळीत करावी, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे. प्रशासनाने त्वरित ठोस निर्णय न घेतल्यास तहसील कचेरीवर मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी निगडित या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन जबाबदारांवर कारवाई करावी आणि नियमित, पारदर्शक कचरा संकलन यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
close