shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे फाइल्स ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

शरद पवार यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात पुण्यातील सोमवार पेठ येथे काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या अध्यक्षपदापासून केली. पुढे पवारांना युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची नामी संधी प्राप्त झाली. त्यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन दादर या नव्या वास्तूत आले होते. तेव्हा सरचिटणीसपदी पुण्याचे क्रीडाप्रेमी मोहन धारिया होते. राष्ट्रीय कबड्डीपटू साधना धारिया (पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागात ती माझ्याबरोबर १९७६-७७ शिकत होती) ही त्यांची कन्या. पवार आणि धारिया दोघांचेही निवासस्थान मुंबईत टिळक भवन येथेच होते. आपल्या पक्षाचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्याकरिता राज्यात विविध ठिकाणी पवार आणि धारिया यांचे दौरे सुरू असत. पवारांनी शाळा व महाविद्यालयात असताना त्यावेळेस होती कबड्डी, खो-खो व ज्युडो या खेळांत खेळाडू म्हणून आपली कारकीर्द गाजवलेली होती. नामवंत ज्युडोपटू खानिवाले हे त्यांच्या पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक होते. त्यांनी पवारांना ज्युडोचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले. शिक्षणात पवार ज्यांना गुरुवर्य मानत, ते बीएमसीसी कॉलेजचे प्राचार्य  प्र. चिं. शेजवलकर हे माझे जवळचे नातेवाईक. पवारांचे मित्र मोहन धारिया तरुणपणी राष्ट्र सेवादलात होते. सेवादलात खेळ आणि शिस्त यांचाही समावेश होता. धारिया यांनी 'वनराई' संस्थेमार्फत ग्रामीण भागात आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रचार केला. शरद पवारांप्रमाणे, संस्थात्मक पातळीवर धारिया यांनीदेखील क्रीडा क्षेत्राला मोठी बळकटी दिली.

 पुणे शहर लोकसभा मतदारसंघांमधून १९६७ साली एसेम जोशी हे काँग्रेसचे उमेदवार विठ्ठलराव गाडगीळ यांचा पराभव करून निवडून आले होते. काँग्रेसच्या दृष्टीने हा मतदारसंघ अवघड होता आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून आणायचा असेल, तर धारिया यांना उभे केले पाहिजे, असा असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यावेळी धारिया हे राज्यसभेचे सभासद होते. परंतु ते पुण्यात एखाद्या लोकनियुक्त लोकप्रतिनिधीसारखे काम करत होते आणि त्यांचा जनसंपर्क मोठा होता. त्यावेळी पुणे शहर काँग्रेस कमकुवत झाली होती. शहर काँग्रेसचे अध्यक्ष रंगराव पाटील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी, १९७० साली झालेल्या निवडणुकीत उभे होते. त्यांचा त्यावेळी पराभव झाला होता. त्यामागे शहरातील काही काँग्रेसवाल्यांचाच हात असल्याचा संशय होता. पुणे शहर लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यावेळी मुळशी तालुका आणि हवेली तालुक्याचा काही भाग समाविष्ट होता. मामासाहेब मोहोळ आणि अण्णासाहेब मगर यांच्या कार्यामुळे तो भाग काँग्रेससाठी बालेकिल्लाच होता. त्यांच्या जोरावरच काकासाहेब गाडगीळ आणि शंकरराव मोरे लोकसभेसाठी पूर्वी विजयी झाले होते. १९७१ साली लोकसभेसाठी स्वतंत्रपणे सार्वत्रिक निवडणुका प्रथमच झाल्या. त्या अगोदर विधानसभेच्या निवडणुकांबरोबर लोकसभेच्या निवडणुका असल्या, की लोकसभेच्या उमेदवाराला फारशी यातायात करावी लागत नसे. मात्र १९७१ साली लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे होत असल्यामुळे धारियांपुढे आव्हानदेखील होते. परंतु धारियांच्याच पुढाकाराने स्थापन झालेली नॅशनल लेबर सेंटर, काही कामगार संघटना, शहरभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते, निष्ठावान नगरसेवक, झोपडपट्ट्या, पूरग्रस्त वसाहती येथील धारियांवर प्रेम करणारी लोकयांच्या वर त्यांची मदार होती. इंदिरा गांधी यांची लोकप्रियता देखील तेव्हा शिखरावर पोहोचलेली होती. धारिया यांच्या विरोधात जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी हे अत्यंत प्रामाणिक नेते उभे होते. समाजवादी पक्षाचे भाई वैद्य आणि शिवसेनेचे नंदू घाटे हे देखील उभे होते. 

 निवडणूक हे लोकशिक्षणाचे साधन असते, असे धारिया यांचे मत होते. धारिया यांच्यावर सेवा दलाचा त्याचप्रमाणे समाजवादाचा संस्कार झाला होता, हे विसरता येणार नाही. निवडणुकीत असंख्य मित्रांनी धारियांना मदत केली. त्यावेळीचे सगळेच नेते साधे होते. आजच्यासारख्या तेव्हा  पंचतारांकित निवडणुका नव्हत्या. खोके, व्होटचोरी, सरसकटपणे गद्दारी, विचारांशी प्रतारणा हा भाग कमी होता. धारियांचा निवडणूक खर्चाचा बोजा उचलण्यासाठी त्यांचे असंख्य सामान्य मित्र (अंबानी, अदानींसारखे नव्हे!) पुढे आले. त्यामध्ये मध्यमवर्गीय आणि कामगारांचा भरणा जास्त होता. निवडणुकीच्या काळात किंवा निवडणूक संपल्यानंतर कार्यकर्त्यांसाठी एकही भोजनाचा किंवा मेजवानीचा कार्यक्रम धारिया यांनी केला नाही. कमीत कमी खर्चात सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी लढवलेली ती निवडणूक होती. प्रचाराची पातळी कोठेही त्यांनी खाली येऊ दिले नाही. प्रचारासाठी हीन भाषेत घरांच्या भिंती रंगवण्यास धारिया यांचा विरोध होता.

घरमालकाची पूर्वपरवानगी घेऊन मजकूर रंगवण्यास त्यांनी परवानगी दिली होती. निवडणुका संपल्यानंतर त्या भिंतींना पुन्हा रंगसफेदी करून देण्याची अटही घातली होती आणि कार्यकर्त्यांनी त्याचे पालन केले, हे उल्लेखनीय. त्यावेळी धारिया राज्यसभेचे खासदार होते. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यास, तो माझ्या नेतृत्वावर जनतेने व्यक्त केलेल्या अविश्वास आहे असे मानून राज्यसभेचा राजीनामा देण्याचा निर्णय धारिया यांनी जाहीर केला होता. अशाप्रकारची त्यांची नैतिकता होती.

  लोकसभा निवडणुकीत धारिया यांचा दणदणीत विजय झाला होता. परंतु त्यांची तत्त्वनिष्ठा जबरदस्त होती. त्यावेळी 'मी निवडून आलो, तर भ्रष्ट व्यापाऱ्यांची चामडी सोलून काढीन' अशी अतिरेकी भाषा मोहन धारिया यांनी व्यापाऱ्यांच्या सभेत काढली. अशा उद्दाम उमेदवाराला तुम्ही निवडून देणार काय? वगैरे आशयाचा मजकूर नानासाहेब परुळेकर यांच्या वर्तमानपत्रात त्यावेळी प्रसिद्ध झाला होता. खरे तर अशा तऱ्हेची भाषा धारिया यांनी कोठेही उच्चारलेली नव्हती. त्यामुळे चंदुलाल चोरडिया, विठ्ठल मणियार, माणिक बाफना, नवलाखा आणि मित्रांनी चौकाचौकात जाऊन सत्यस्थिती समजावून देऊन, धारिया असे काही बोललेच नाहीत. तेव्हा त्यांना साथ द्या, असे आवाहन केले. आता धारिया यांनी तसे उद्गार काढले नव्हते, तरीदेखील गोरगरीब झोपडपट्टीवासीय मात्र  त्यांच्यावर खूष होते...

 निवडणूक झाल्यानंतर एकदा परुळेकर आणि धारिया दिल्लीहून मुंबईला एकाच विमानाने येणार होते. त्यावेळी परुळेकर थोडे आजारीच होते. त्यांना चालण्याचा त्रास होऊ नये, म्हणून आपल्या स्वागतासाठी आलेली गाडी धारिया यांनी मुद्दाम विमानाजवळ बोलावून घेतली. त्यावेळच्या राजकीय नेत्यांचा सुसंस्कृतपणा कसा होता, याचेच हे उदाहरण होय. एवढेच नव्हे, तर निवडणुकीनंतर साहित्य परिषदेच्या सभागृहात धारिया यांचा कार्यक्रम होता. तेथे 'तरुण भारत'चे संपादक आले आणि कार्यक्रमानंतर त्यांनी धारिया यांना चहापानाचे आमंत्रण दिले.

 वास्तविक निवडणुकीमध्ये त्या वृत्तपत्राने धारिया यांच्याविरोधी प्रचार केला होता. निवडणुकीपूर्वी आपण काँग्रेसचा उमेदवार होतो. पण निवडून आल्यानंतर सर्व पुणे शहराचा मी खासदार होतो हे लक्षात घेऊन, धारिया यांनी ते निमंत्रण स्वीकार स्वीकारले. त्याकाळची राजकीय संस्कृती कशी होती हे पाहण्यासारखे आहे. 

काँग्रेसमध्ये असूनही, धारिया यांनी आणीबाणीला विरोध केला आणि ते तुरुंगात गेले. १९७७ साली पुणे विद्यापीठाचा वृत्तपत्र विद्या विभागाचा विद्यार्थी म्हणून मी अभ्यास दौऱ्यात सहभागी झालो होतो. त्यावेळी धारिया यांची नुकतीच तुरुंगातून मुक्तता झाली होती. तेव्हा त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आम्हा विद्यार्थ्यांना योग आला होता. धारिया यांची प्रसन्न मुद्रा आजही आठवते. धारिया यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी 'लोकसेना' स्थापन केली होती. असंख्य तरुणांना त्यांनी संघटित केले होते. १९५७  ते १९६० या काळात ते पुणे महापालिकेत नगरसेवक होते. तेथून राजकारणात त्याकाळी 'तरुण तुर्क' म्हणून ते प्रसिद्धीस आले. त्यांनी नेहमीच पुरोगामी विचारांचा आग्रह धरला आणि 'वनराई' संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे मोठे काम केले. 

स.प. कॉलेजजवळ धारिया यांचे निवासस्थान होते. तेथे अन्य ठिकाणी त्यांची भेट झाल्याचेही मला आठवते. १४ फेब्रुवारी १९२५ हा धारिया यांचा जन्मदिवस. पुण्यातील या नेमस्त आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाची आठवण लोक कधीही विसरणार नाहीत..
close