जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
रुपारेल महाविद्यालय येथे शनिवारी (दि. १४) ६३ व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनाचे उदघाटन झाले.
नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेंड्स ऑफ ट्रीज या संस्थेतर्फे अनेक दशकांपासून या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.
मानद अध्यक्षा फिरोजा गोदरेज यांच्या उपस्थितीत झालेल्या उदघाटन समारोह व उद्यान स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमाला यंदा डॉ कुमार केतकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ अरुण सावंत, माजी अध्यक्ष डॉ अशोक कोठारी, मानद सचिव सकीना गाडीवाला, प्रदर्शन समितीचे अध्यक्ष डॉ चंद्रकांत साळुंखे, धडाडीचे कार्यकर्ते व उपाध्यक्ष तुषार देसाई व रुपारेलचे प्राचार्य डॉ दिलीप मस्के उपस्थित होते.
ढासळत चाललेल्या पर्यावरणाबद्दल डॉ फिरोजा गोदरेज यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून गंभीर चिंता व्यक्त केली. अत्याधुनिक पायाभूत निर्माण करण्यासाठी होत असलेल्या तिवरांच्या कत्तलीचे कुणालाच दुःख होत नाही याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करताना सर्वांना अंतर्मुख केले.
प्रदर्शनाच्या वाटचालीचा आढावा घेताना हे प्रदर्शन पूर्वी राजभवन येथे होत असल्याची आठवण डॉ फिरोजा गोदरेज यांनी सांगितली. कालांतराने सुरक्षा कारणास्तव प्रदर्शन राजभवन येथून हलवून प्रथम व्हीजेटीआय माटुंगा येथे व गेल्या काही वर्षांपासून रुपारेल महाविद्यालय येथे आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदर्शनाचे स्थान बदलले असले तरीही मुंबईतील या जुन्या प्रदर्शनामुळे जनसामान्यांमध्ये निसर्ग व पर्यावरणाबद्दल जागृती झाली असल्याचे फिरोजा गोदरेज यांनी सांगितले.
डॉ कुमार केतकर यांनी देखील हे प्रदर्शन राजभवनात व्हायचे त्यावेळी आपण त्याला भेट दिल्याचे सांगितले.
राजभवनात होणारे हे प्रदर्शन बंद होऊन जवळपास पाच दशके झाली. राजभवनाचे सेवानिवृत्त अधिकारी फिलिप फर्नांडिस यांच्या आठवणीनुसार १९७० दशकाच्या मध्यापर्यंत मुंबई राजभवन तसेच पुणे येथील राजभवन येथे देखील फळे, फुले व भाजीपाल्याचे प्रदर्शन आयोजित केले जायचे. मुंबई राजभवन येथील - आता लोकभवन येथील - दर्शनी भागातील हिरवळ, दरबार हॉल तसेच जलविहार सभागृह या ठिकाणी झाडे ठेवली जायची असे त्यांनी सांगितले. तीन दिवसांच्या या प्रदर्शनाला हजारो लोक भेट द्यायचे असेही त्यांनी सांगितले.
आज हे प्रदर्शन मुंबई, ठाणे तसेच अंधेरी व पुणे येथील होत असून हे 'फ्रेंड्स ऑफ ट्रीज'च्या कार्याचे फलित असल्याचे गोदरेज यांनी सांगितले.
आज जगात सर्वत्र पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होत आहे. राज्यातील सर्व नद्या प्रदूषित झाल्या आहेत. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. एक दिवस असा येईल की केवळ 'फ्रेंड्स' राहतील, 'ट्रीज' राहणार नाही अशी भीती डॉ केतकर यांनी व्यक्त केली.
आज डॉ केतकर, गोदरेज व डॉ सावंत यांच्या हस्ते उद्यान स्पर्धेतील विविध विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. हे प्रदर्शन दिनांक १५ फेब्रुवारी पर्यंत खुले राहणार आहे.
लोकभवनाने या स्पर्धांमध्ये अनेक वर्षे सहभाग घेतला व येथील उद्यान विभागाने अनेकदा पारितोषिके देखील जिंकली आहेत.

