शिवचरित्राच्या आचरणातूनच घडेल समर्थ राष्ट्र; पदवीपेक्षा चारित्र्य महत्त्वाचे! – युवा शिवव्याख्याते प्रफुल्ल खपके
शिवरायांचे विचार, हेच आमचे संस्कार! - पत्रकार तुषार महाजन
शिर्डी प्रतिनिधी:
शिर्डी येथील श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलात' (साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूल व साई निर्माण ज्युनियर कॉलेज) आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. “केवळ इतिहासाच्या पुस्तकात अडकून न राहता, युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आणि मूल्यांचे प्रत्यक्ष जीवनात आचरण केले, तरच खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्मिती घडेल. आजच्या तरुणाला केवळ पदवीधर होऊन चालणार नाही, तर चारित्र्यसंपन्न आणि जबाबदार नागरिक बनण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध युवा शिवव्याख्याते प्रफुल्ल प्रकाश खपके यांनी केले.
ते “छत्रपती शिवाजी महाराज – युवकांचे प्रेरणास्थान” या विषयावरील विशेष व्याख्यानात बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती आणि शिवआरती:
या कार्यक्रमासाठी साई निर्माण शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष सन्माननीय विजयभाऊ कोते पाटील आणि उपाध्यक्ष श्री. ताराचंदभाऊ कोते पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर सुहास भालेराव सर यांनी प्रास्ताविकात शिवविचारांवर आधारित अत्यंत सुंदर कविता सादर करून वातावरणात नवचैतन्य निर्माण केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप चाफेकर सर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रीन फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व पत्रकार तुषार संजय महाजन उपस्थित होते. याप्रसंगी मंचावर साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री. संदीप डांगे सर, कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री. राम ढगे सर, अरबाज पठाण सर, नवनाथ वाणी सर, ज्ञानेश्वर चौधरी सर, रवि कोते सर आदी मान्यवर उपस्थित होते.
मावळ्यांचे बलिदान आणि रयतेचे राज्य:
प्रमुख प्रवक्ते प्रफुल्ल खपके यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग उलगडले. महाराजांनी कशाप्रकारे आपले स्वराज्य स्थापन केले आणि त्यासाठी किती मावळ्यांनी बलिदान दिले, हे अत्यंत सोप्या व प्रभावी भाषेत सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
स्वराज्यातील नैतिक मूल्यांवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, “स्वराज्यात परस्त्रीला मातेसमान मानले जाई. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, असे सक्त आदेश महाराजांनी सैन्याला दिले होते. यामागे रयतेविषयीची कणव दिसून येते. पोटाची खळगी भरली की पाठीचा कणा ताठ राहतो, हे महाराजांनी ओळखले होते.” स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊंनी बालशिवबांवर केलेले संस्कार हेच स्वराज्याच्या उभारणीचे मूळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
उत्कृष्ट नियोजन व सांगता:
या शानदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना तुंबारे मॅडम, सौ. राणी पगार मॅडम आणि सौ. पुजा झोटिंग मॅडम यांनी अतिशय बहारदारपणे केले. तर, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. पूनम डांगे मॅडम यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
शिवविचार हेच यशाचे गमक – पत्रकार तुषार महाजन
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या आणि सोशल मीडियाच्या युगात दिशा हरवू नये म्हणून शिवचरित्र हाच एकमेव दीपस्तंभ आहे. शिवचरित्र हे केवळ इतिहास नसून ते एक ‘मॅनेजमेंट गुरु’चे पुस्तक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना न डगमगता सामोरे जाण्यासाठी शिवरायांचे धैर्य आणि समयसूचकता अंगी बाणवली पाहिजे. शिवविचार हे केवळ ऐकण्यासाठी नसून जगण्यासाठी आहेत, तरच तुमची आणि देशाची प्रगती निश्चित आहे.
-तुषार संजय महाजन
(लेखक व पत्रकार)

