shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देहरे परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट..नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; रात्री पोलीस गस्त वाढवण्याची जोरदार मागणी

देहरे प्रतिनिधी:- नगर तालुक्यातील देहरे गावासह परिसरातील व लगतच्या गावांमध्ये मोटारसायकल व अन्य मौल्यवान वस्तू चोरी करणारी चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. विशेष म्हणजे देहलरे गावात तब्बल दहा जणांची टोळी कार्यरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून, त्यांच्या कडे धारदार शस्त्र असल्याचे बोलले जात आहे.यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चोरटे आधी काही दिवस गावात वेगवेगळ्या कारणांचा बहाणा करून येत आहेत. कधी भांडी विक्री, कधी जुनी वस्तू खरेदी, तर कधी इतर किरकोळ विक्रीच्या निमित्ताने ते गावात वावर करत असल्याचे आढळून येत आहे. गावातील परिस्थिती, घरे, वाहनांची ठेवण, रात्रीची हालचाल यांचा बारकाईने अंदाज घेतल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी चोरी करून हे चोरटे पसार होत असल्याचे प्रकार देहरे व इतर गावांमध्ये समोर आले आहेत.
अलीकडे काही नागरिकांच्या मोटारसायकली तसेच घराबाहेर ठेवलेल्या वस्तू चोरीस गेल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. “कोण ओळखीचा, कोण परका हेच ओळखणं कठीण झालं आहे,” अशी भावना अनेक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
        या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने वेळीच आणि तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी नियमित पोलीस गस्त, संशयास्पद व्यक्तींची चौकशी तसेच गावांमध्ये अचानक तपासणी मोहीम राबविण्याची आवश्यकता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
          वेळीच कठोर पावले उचलली नाहीत, तर चोरट्यांचे मनोबल वाढून भविष्यात मोठ्या घटनांची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही ग्रामस्थांकडून दिला जात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.
००००
close