shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नांदेडमध्ये आठवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन उत्साहात.., महादेव डांबरे यांना ‘महानायक कांशीरामजी समाजकार्य पुरस्कार’ प्रदान

नांदेड (प्रतिनिधी) : अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद आयोजित आठवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदेड येथे अत्यंत उत्साहात आणि विचारमंथनाच्या वातावरणात पार पडले. संत परंपरेतील समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना अधोरेखित करणाऱ्या या भव्य संमेलनात देशभरातील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक व विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या संमेलनाचा मुख्य आकर्षण ठरला तो समाजसेवक महादेव डांबरे (छत्रपती संभाजीनगर) यांना प्रदान करण्यात आलेला ‘महानायक कांशीरामजी समाजकार्य पुरस्कार’. सामाजिक न्याय, वंचित घटकांचे सक्षमीकरण आणि समतेच्या चळवळीत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पुरस्कार प्रदान सोहळा अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडला. संमेलनाचे मुख्य संयोजक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर साहेब तसेच संमेलनाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. निर्मला भामोदे यांच्या हस्ते महादेव डांबरे यांना शाल, पुष्पहार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी आपल्या मनोगतात महादेव डांबरे यांनी संत परंपरेतील समतेचा संदेश समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. “हा सन्मान माझा नसून समाजाचा आहे. समतेचा दीप प्रज्वलित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने कार्य केले पाहिजे,” असे ते म्हणाले.
संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, काव्यवाचन, साहित्य चर्चा आणि सामाजिक प्रश्नांवर चिंतनपर सत्रे आयोजित करण्यात आली. संत गुरु रविदास यांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक परिवर्तनासाठी साहित्याची भूमिका अधोरेखित करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आयोजन व व्यवस्थापन उत्कृष्टरीत्या पार पडले. नांदेड नगरीत भरलेल्या या साहित्य सोहळ्याने समतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश नव्या उर्जेसह सर्वत्र पोहोचवला.
समतेचा विचार, साहित्याची ताकद आणि समाजकार्याचा गौरव — या त्रिवेणी संगमाने नांदेडमधील हे संमेलन अविस्मरणीय ठरले. 
close