भारताविरुद्ध पाकिस्तानच्या क्रिकेटींग नाटकाचा भांडंफोड
आगामी टी२० ट्वेंटी विश्वचषक जसजसा जवळ येऊ लागला त्यात तसतसा ट्वीस्ट नव्याने येत आहे. हा चमत्कार कुणी हिरो करत नसून अंगात छत्तीस नखरे असलेला आपला शेजारी देश म्हणजे महाखलनायक पाकिस्तान आहे. सुरुवातीला बांगलादेशला या स्पर्धेतून बहिष्कार टाकण्यास भरीस घातलं व स्वतः आग लावायचं काम करत स्पर्धेत भाग घेतला, पण पारंपारीक प्रतिस्पर्धी भारताविरूध्द १५ फेब्रुवारीला कोलंबो येथे सुनियोजित असलेला सामना खेळण्यास नकार दिला.
पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना “बॉयकॉट” करण्याची भाषा केली आणि क्रिकेटविश्वात एकच प्रश्न उभा राहिला, नेमकं (बहिष्कार) बॉयकॉट का ? मागील काही दिवसांत भारताने पाकिस्तानवर हल्ला केला नाही, भारताने पाकिस्तानला भारतात खेळायला फोर्स केले नाही, आयसीसीने पाकिस्तानविरोधात कोणताही अन्याय केले नाही. मग हा बॉयकॉट कोणत्या जखमेवरचा निषेध आहे ? उत्तर साधं व सरळ आहे, भारताकडून होणाऱ्या संभाव्य पराभवाच्या भीतीचा !
राजकारण नव्हे, पराभवाची भीती
जर भारताविरुद्ध एवढाच राग होता, तर आशिया कपमध्ये खेळलात कसे ? आयसीसी स्पर्धांमध्ये भारतासोबत ड्रॉ स्विकारलात कसा ? टीव्ही हक्क, जाहिराती, प्रायोजक कमाई, हे सर्व लाभ घेतलेत कसे ? खरं तर हा बॉयकॉट राजकीय नाही, तर क्रिकेटींग अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे.
मैदानात उतरले, तर पराभव निश्चित होता,
म्हणून आधीच “खेळलोच नाही” असे जाहीर करून स्वतःला सुसज्ज केले. पाकिस्तानी बोर्डाची ही जुनी युक्ती आहे. पराभव दिसला की नाटक सुरू करणे.
भारतीय फलंदाजी पाकिस्तानी गोलंदाजांची फजिती भीती
आज भारतीय संघाकडे अशी फलंदाजी आहे की, ती केवळ सामना जिंकत नाही, तर विरोधकाची मानसिकता पूर्णपणे उद्ध्वस्त करते.
अभिषेक शर्मा – पहिल्या षटकात सामन्याची दिशा बदलवतो.
ईशान किशन – वेग, ताकद आणि निर्भीडपणाचा स्फोट घडवितो.
सूर्यकुमार यादव – शॉट्स इतके धोकादायक मारतो की, यंत्रमानवागत वाटतात.
हार्दिक पांड्या – दबावात सामना संपवणारा अष्टपैलू खेळाडू.
शिवम दुबे – गोलंदाजी स्पिन असो वा वेगवान, थेट स्टँडमध्ये चेंडू पाठवणारा खतरनाक फलंदाज.
ही पाच नावं पाहूनच पाकिस्तानचा आत्मविश्वासुरूवातीलाच डगमगतो. टी-२० क्रिकेटमध्ये १८०-१९० धावा काहीच सुरक्षित नाहीत, १२ षटकांत सामना संपण्याची ताकद भारताकडे आहे,आणि ही वस्तुस्थिती पाकिस्तान पचवू शकत नाही.
हरायचं टाळण्यासाठी बॉयकॉट
पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास पाहिला, तर एक गोष्ट सातत्याने दिसते की, पराभव दिसल्यावर ते नाटकं सुरू करतात. कधी पंचांवर आरोप, कधी मैदानावर भांडण, कधी हवामानाचा बहाणा, कधी खेळपट्टयांनाच दोष देणे, बॉलमध्ये चीप, बॅटमध्ये चीप, चेंडू कुरतडणे असे आरोप करणे, आणि आता चक्क बॉयकॉट म्हणजे खेळण्यासच नकार ! ही खेळाडूंची नव्हे, तर प्रशासनाची भीती आहे. एक मोठा पराभव म्हणजे क्रिकेट बोर्डावर प्रश्न, खेळाडूंवर टीका, प्रायोजकांचा रोष, देशात असंतोष
म्हणून मैदानात उतरून हरायचं नाही, आधीच पळ काढायचा, हीच आजची “रणनीती” स्वतःलाच फसविणारी !
आयसीसीचा निर्णय आणि धोकादायक परिणाम
पाकिस्तान कदाचित विसरतोय की, आयसीसी नियमांवर चालते, भावनांवर नाही. निवडक सामन्यांचा त्यांना बहिष्कार मान्य नाही.
“फक्त भारताविरुद्ध खेळणार नाही” असा पर्याय नाही. एक सामना न खेळल्यास संपूर्ण स्पर्धेतून हकालपट्टी शक्य आहे. म्हणजेच, भारताला धडा देण्यासाठी घेतलेला हा बॉयकॉट स्वतःवरच उलटू शकतो. पूर्ण वर्ल्डकप गमावला, टीव्ही रेव्हेन्यू गमावणे, आयसीसी फंड थांबणे, आणि भविष्यातील स्पर्धांवर बंदी हे सर्व पर्याय उघडे आहेत.
आर्थिक कोंडी आणि क्रिकेटींग फुशारकी
आज पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आधीच आर्थिक अडचणीत आहे, खेळाडूंचे मानधन वेळेवर देत नाही,
आणि आयसीसीच्या निधीवर अवलंबून आहे.
देशाची अर्थव्यवस्था कर्जावर चालते, अमेरिकेकडूनच नाही इतर अनेक घेतलेले कर्ज वाढत आहे तर काहींचे थकले आहे, हफ्तेही वेळेवर जात नाही. अशा स्थितीत क्रिकेटमधून महसूल गमावणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं. खरं तर पाकिस्तान घोषणांमध्ये आघाडीवर राहतो, परिणामांचा विचार नाही.
भारतासाठी हे फक्त मनोरंजन
या सगळ्या गोंधळात भारताचं स्थान स्पष्ट आहे,
संघ तयार आहे. फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. गोलंदाजी धारदार आहे. आत्मविश्वास शिखरावर आहे. पाकिस्तान खेळला, सामना झाला. खेळला नाही, आयसीसी निर्णय लागू होईल. भारत कोणाच्याही बॉयकॉटवर अवलंबून नाही.
आपल्याला फक्त मज्जा बघायची आहे. तसे भारतात दोन गुण फुकटात मिळणारच आहे.
बॉयकॉटचा खरा अर्थ
हा बॉयकॉट म्हणजे नैतिक नाही, नियमांमध्ये नाही
राजकीय कारण नाही, तो आहे फक्त भारतीय फलंदाजीच्या भीतीतून घेतलेला पळ.
मैदानात उतरून सामना जिंकायची हिंमत नसल्यास,
बॉयकॉट जाहीर करून स्वतःला बाजूला करणे
हे पाकिस्तानचं जुनं नाटक आहे.
निष्कर्ष
भारताविरुद्धचा सामना टाळून पाकिस्तान आपलं क्रिकेट वाचवत नाही, तर स्वतःची कमजोरी जगासमोर उघडी पाडत आहे. क्रिकेटमध्ये एक साधा नियम आहे. खेळून हरलेला संघ परत उभा राहतो,
पण खेळायलाच नकार देणारा संघ हास्याचा विषय बनतो. आज पाकिस्तान त्या हास्याच्या उंबरठ्यावर उभा आहे, आणि भारतीय चाहते ? ते फक्त मज्जा बघत आहेत !
आपल्याला एक गोष्ट स्पष्ट सांगतो की, पाकिस्तानचा हा बार फुसका निघणार आहे. त्याचं महत्वाचं कारण, स्पर्धा ठरण्यापूर्वीच सर्व देश करारांवर सह्या करतात, म्हणजे आयसीसीचे नियम त्यांना मान्य असतात. आता आयसीसी त्यांना आपला असली इंगा दाखवेल व त्या भीतीने पाकिस्तान गुमान सगळे सामने खेळेल, अगदी भारताबरोबरचाही. आयसीसीचा रोष पाकिस्तानमधील क्रिकेट संपविणारा आहे. हे पाकिस्तानला ध्यानात घ्यावेच लागेल.
@डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२.

