shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई संस्थान कामगारांचा वनवास संपला; सेवा प्रवेश नियम व आश्वासित प्रगती योजना अखेर मार्गी!



तदर्थ समिती अध्यक्षा श्रीमती अंजू शेंडे यांचा एम्प्लॉईज सोसायटीतर्फे विशेष सत्कार

नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
श्री साईबाबा संस्थानमधील कामगारांच्या जिव्हाळ्याचा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सेवा प्रवेश नियम, तसेच १०, २०, ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे संस्थानच्या कामगारांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून संस्थानच्या कामगारांचे सेवा प्रवेश नियम आणि आश्वासित प्रगती योजनेचा प्रश्न प्रलंबित होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या विशेष प्रयत्नांना यश आले असून, कामगारांना न्याय मिळवून देण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
तसेच, प्रशासकीय पातळीवर हा विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा अहमदनगरच्या प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के) आणि संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने श्रीमती अंजू शेंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याबद्दल श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी मनस्वी आनंद व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. या सत्कार प्रसंगी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी श्री. संदिपकुमार भोसले, सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, संचालक रामजी गागरे आणि अनिल थोरात, यांच्यासह इतर कर्मचारी बांधव उपस्थित होते.
close