shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संजू सॅमसनच्या झुंजार खेळीने विंडीजचे आव्हान परतवले ; भारत दिमाखात उपांत्य फेरीत

विवारी कोलकात्यातील सुप्रसिद्ध ईडन गार्डन स्टेडियमवर वेस्ट इंडिजला हरवून भारताने टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. अशाप्रकारे गतविजेत्या भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा या स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. जर भारत वेस्ट इंडिजला हरवू शकला तर त्यामागे सर्वात मोठे योगदान सलामीवीर संजू सॅमसनचे आहे. संजूने दमदार खेळी केली. सॅमसनने भारतासाठी सुरूवातीपासून किल्ला सांभाळला आणि शेवटपर्यंत लढत राहिला. सॅमसनने विजयी चौकार मारताच, भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आनंदाची लाट पसरली. आता ५ मार्च रोजी दुसऱ्या सेमी फायनल मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताचा सामना इंग्लंडशी होईल.
ईडन गार्डन्सवर सॅमसनची बॅट चमकली
रविवार कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. वेस्ट इंडिजने २० षटकांत ४ बाद १९५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, संजू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांच्या जबाबदार खेळीमुळे भारताने १९.२ षटकांत ५ बाद १९९ धावा केल्या आणि सामना जिंकला. सॅमसनने शतक झळकविले नसले तरी त्याने प्रत्येक भारतीय चाहत्याला आनंदी राहण्यासारखे खूप काही दिले.

टी-२० विश्वचषकादरम्यान, जेव्हा इतर भारतीय फलंदाज अपयशी ठरले, तेव्हा एका नावाला संधी देण्याची मागणी सुरू झाली, ते नाव होते संजू सॅमसन !  जेव्हा संजूला पुन्हा संधी मिळाली तेव्हा त्याने अशा फलंदाजीने उत्तर दिले की, टीकाकारांनाही टाळ्या वाजवाव्या लागल्या. त्याचे पुनरागमन ही केवळ धावा काढण्याची कहाणी नाही तर ती आत्मविश्वास, संयम आणि धैर्याचा विजय आहे. संजू सॅमसनने दाखवून दिले की जर हेतू मजबूत असतील तर प्रत्येक अपयश पुढे जाण्याची ताकद देते.

कोलकात्यात १००% विजयाचा विक्रम कायम

अशा प्रकारे भारतीय संघाने कोलकात्यात वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मध्ये १००% विजयाचा विक्रम कायम ठेवला आहे. ईडन गार्डन्सवर भारत आणि वेस्ट इंडिजमधील हा पाचवा टी२० सामना होता. मनोरंजक म्हणजे, भारताने पाचही सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. शिवाय, भारतीय संघाने १० वर्षांनंतर या मैदानावर टी२० विश्वचषक सामना खेळला आणि संघाने पुन्हा एकदा विजय मिळवला.

विंडीजसाठी सॅमसन धोकादायक ठरला

लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताने अभिषेक शर्माला लवकर गमावले, तो फक्त १० धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताने पॉवरप्लेमध्ये ईशान किशनची विकेट गमावली. इशान चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण तोही १० धावाचकाढू शकला. दोन धक्क्यानंतर, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि सॅमसनने तिसऱ्या विकेटसाठी ५८ धावा जोडल्या, ज्यामध्ये सॅमसनने ३५ धावांचे योगदान दिले. तथापि, सूर्यकुमार १८ धावा काढून बाद होणारा तिसरा खेळाडू ठरला.

सॅमसनने २६ चेंडूत स्वतःचे अर्धशतक पूर्ण केले. या डावात तिलक वर्मानेही त्याला साथ दिली, परंतु तिलक १५ चेंडूत २७ धावांवर बाद झाला. तिलक आणि सॅमसनने ४२ धावांची भागीदारी केली. १९ व्या षटकात भारताला पाचवा धक्का बसला, जेव्हा हार्दिक पंड्याला शमर जोसेफने बाद केले. हार्दिक १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हार्दिक बाद झाला तेव्हा सामना रोमांचक स्थितीत होता.

भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता, पण सॅमसन एका टोकाला टिकून राहिला. रोमारियो शेफर्डने टाकलेल्या २० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सॅमसनने चौकार मारला आणि संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले. सॅमसन ५० चेंडूत १२ चौकार आणि चार षटकारांसह ९७ धावांवर नाबाद राहिला, तर शिवम दुबे चार चेंडूत दोन चौकारांसह नाबाद आठ धावा फटकविल्या. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर आणि शमर जोसेफने प्रत्येकी दोन बळी घेतले, तर अकील हुसेनने एक बळी मिळविला.

वेस्ट इंडिजचा डाव
तत्पूर्वी, वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप आणि रोस्टन चेस यांनी ८.५ षटकांत पहिल्या विकेटसाठी ६८ धावा जोडल्या. होप ३३ चेंडूंत ३२ धावा काढून बाद झाला, ज्यामध्ये एक षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता, त्यानंतर चेसने हेटमायरसह दुसऱ्या विकेटसाठी ३४ धावा जोडल्या. संघाने ११९ धावांवर चार विकेट गमावल्या. ज्यातून जेसन होल्डर आणि रोवमन पॉवेल यांनी ३५ चेंडूंत पाचव्या विकेटसाठी ७६ धावा जोडून संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. पॉवेल १९ चेंडूंत दोन षटकार आणि तीन चौकारांसह नाबाद ३४ धावा, तर होल्डरने २२ चेंडूंत पाच चौकारांसह नाबाद ३७ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेतल्या. हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक बळी मिळाला.

१० वर्षांनंतर भारताने बदला घेतला
३१ मार्च २०१६ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी-२० विश्वचषक उपांत्य सामन्यात, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विराट कोहलीच्या ४७ चेंडूत नाबाद ८९ धावांच्या मदतीने २ बाद १९२ धावा केल्या. ती धावसंख्या कमी नव्हती, परंतु वेस्ट इंडिजच्या दमदार फलंदाजीमुळे ती छोटी वाटली. लेंडल सिमन्सच्या ५१ चेंडूत नाबाद ८२ धावा, ज्यामध्ये पाच षटकार आणि सात चौकार होते आणि आंद्रे रसेलच्या २० चेंडूत स्फोटक ४३ धावा, यामुळे वेस्ट इंडिजने १९.४ षटकांत तीन बाद १९६ धावा करून सामना जिंकलाच नाही तर घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्याचे भारताचे स्वप्नही भंग केले. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने आता १० वर्षांनंतर बदला घेतला. त्यावेळी, वेस्ट इंडिजने भारतीय चाहत्यांचे मन मोडले होते आणि आज, भारताने वेस्ट इंडिजची वाटचाल थांबवली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाने धडा शिकवला
भारताने टी-२० विश्वचषकाची सुरुवात शानदारपणे केली होती. गट टप्प्यात संघाने सर्व सामने जिंकले आणि सुपर एटमध्ये प्रवेश केला. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच, भारताला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते, परंतु सुपर एट सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी पराभव पत्करावा लागल्याने संघाच्या मोहिमेला धक्का बसला. हा पराभव विनाशकारी होता आणि त्यानंतर वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा मोठ्या फरकाने पराभव केला, ज्यामुळे भारताचा मार्ग कठीण झाला.


भारताचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे उर्वरित दोन सामने जिंकणे आणि दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजलाही पराभूत करणे गरजेचे होते. अखेर भारताला दिलासा मिळाला, संघाच्या अपेक्षेप्रमाणेच घडले. शेवटी, सर्व गणिते मोडून काढत, भारत तीन सामन्यांतून चार गुणांसह सुपर एटमधून अंतिम चारमध्ये पोहोचला, तर दक्षिण आफ्रिकेने सर्व तीन सामने जिंकले आणि आधीच उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले तर वेस्ट इंडिजची मोहीम तिथेच संपली.

आता येत्या ५ मार्चला भारताला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडशी दोन करायचे असून ४ मार्चला दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड दरम्यान कोलकाताच्या ईडन गार्डनवर होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यातून अंतिम फेरीत पोहोचणारा एक संघ ठरेल. तर ८ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना रंगेल. सन २०२४ च्या टि२० विश्वचषकात भारत व दक्षिण अंतिम सामन्यात झुंजले होते, त्यात भारताने बाजी मारली होती. यावेळी याच समिकरणाची पुनरावृत्ती होते का हे बघणे मनोरंजनाबरोबरच औत्सुक्याचेही ठरणार आहे.

@डॉ.दत्ता विघावे               
     क्रिकेट समिक्षक
    मो. क्रं - ९०९६३७२०८२.
close