उपमुख्यमंत्र्यांना दिली श्री साईबाबांची प्रतिमा; शिर्डी दर्शनाचे दिले आग्रहाचे निमंत्रण
शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रमेश गोंदकर यांनी काल मुंबईतील 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी राज्याच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांची विशेष सदिच्छा भेट घेतली. या महत्त्वपूर्ण भेटीत शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली, तसेच आगामी काळात शिर्डीत पक्षाची ताकद अधिक भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी रमेश गोंदकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा यथोचित सन्मान करत त्यांना श्री साईबाबांची सुबक प्रतिमा भेट दिली. तसेच, साईंच्या दर्शनासाठी आवर्जून शिर्डीला येण्याचे आग्रहाचे निमंत्रणही त्यांनी यावेळी दिले.
तत्पूर्वी, 'देवगिरी' बंगल्यावर या भेटीच्या सुरुवातीला उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी रमेश गोंदकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी अमृत गायके, सुशांत औताडे आणि अमोल सुपेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
शिर्डी नगरपरिषदेतील यशाचा मांडला लेखाजोखा
या विशेष भेटीबाबत अधिक माहिती देताना रमेश गोंदकर म्हणाले की, "नुकत्याच पार पडलेल्या शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत उत्कृष्ट आणि दखलपात्र कामगिरी बजावली आहे. पक्षाचे शिर्डी शहराध्यक्ष तथा नगरपरिषदेचे स्वच्छता आणि आरोग्य-वैद्यकीय समितीचे विद्यमान सभापती दीपक भैय्या गोंदकर यांनी या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य घेत विजयी होण्याचा बहुमान मिळवला आहे. कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या साथीने मिळवलेले हे यश पक्षासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
एकदिलाने करणार काम
"भविष्यात शिर्डी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी व पक्षाची ताकद अधिक वाढवण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी एकदिलाने आणि पूर्ण क्षमतेने काम करणार आहोत," अशी ग्वाही गोंदकर यांनी यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना दिली. यावर उपमुख्यमंत्र्यांनीही पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

