राहुरी : जागतिक महिला दिनानिमित्त देवळाली प्रवरा, राहुरी व राहुरी फॅक्टरी परिसरातील एकल महिलांसाठी मोफत स्त्रीरोग व कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सौ. प्रतिमा हेरंब कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात येणार आहे.
आप्पासाहेब ढूस मित्र मंडळाच्या वतीने तसेच साऊ एकल महिला समिती, राहुरी तालुका वात्सल्य समिती, एसबीआय फाउंडेशन मुंबई, डॉ. माने मेडिकल फाउंडेशन राहुरी, युगंधरा सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान राहुरी, सहारा फाउंडेशन देवळाली प्रवरा व स्वराज्य फाउंडेशन राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचे आयोजन तीन ठिकाणी करण्यात आले असून मंगळवार दि. १७ मार्च २०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, देवळाली प्रवरा येथे, शुक्रवार दि. २० मार्च २०२६ रोजी श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळा, राहुरी येथे तसेच रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी डी पॉल स्कूल, प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत शिबिर पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये महिलांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, स्तनातील गाठींची तपासणी, गर्भाशय तपासणी, तोंडाची तपासणी, मोफत औषधोपचार तसेच आवश्यक त्या आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहेत. तसेच मोफत सोनोग्राफीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय गर्भपिशवीच्या समस्या, गाठी, सूज, रक्तस्राव, पोटदुखी, कॅल्शियमची कमतरता, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, अशक्तपणा आदी समस्यांबाबत तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे.
देवळाली प्रवरा, राहुरी व राहुरी फॅक्टरी पंचक्रोशीतील एकल माता व महिलांनी आपल्या सोयीच्या ठिकाणी व वेळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन साऊ एकल महिला समिती व आप्पासाहेब भिमराज ढूस मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी आप्पासाहेब ढूस (देवळाली प्रवरा) – ९८२३०३५९३६ यांच्याशी संपर्क साधावा.

