अकोले : दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत सहाय्यक साधनांचे तपासणी शिबिर अकोले येथे आठ मार्च रोजी आयोजित करण्यात आले असून तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अध्यक्ष डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांच्या सी.एस.आर योजने अंतर्गत दिव्यांग जनांना मोफत सहाय्यक साधने व उपकरणे वाटप करण्यासाठी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (ALIMCO) व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणी शिबिराचे आयोजन रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत अगस्ति माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अकोले, जि.अहिल्यानगर येथे करण्यात आलेले आहे.
शिबिरादरम्यान खालील उपकरणांसाठी पात्र लाभार्थ्यांची तपासणी व नोंदणी करण्यात येणार आहे. यात व्हीलचेअर, कुबड्या, चालण्याच्या काठ्या, श्रवणयंत्र, ८० % अस्थिव्यंगासाठी बॅटरीवर चालणारी तीनचाकी सायकल, सेरेब्रल पाल्सी खुर्ची, अंध व्यक्तींसाठी ब्रेल किट, सुगम्य केन, स्मार्टफोन, ADL किट, रोलेटर्स, बॅटरी चलित व्हीलचेअर, टी.एल.एम. किट इत्यादी सहाय्यक साधनाकरिता भारत सरकारच्या पात्रता निकष व मार्गदर्शक तत्त्वांनुसार लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येईल. पात्र लाभार्थ्यांना ३१ मार्च २०२६ पर्यंत उपकरणांचे वितरण अकोले येथे करण्यात येणार आहे.
या शिबीराचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व रेशन कार्ड याची मूळ प्रत व एक सत्य प्रत बरोबर आणणे गरजेचे आहे. तसेच पात्रतेसाठी दिव्यांग बांधवाने या अगोदर ३ वर्ष केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेतून सहायक साधने घेतलेली नसावी. या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अकोले तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीपर्यंत आवश्यक सहाय्यक उपकरणे पोहोचवून त्यांचे जीवन अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनवणे आहे असे प्रतिपादन डॉ.सुजय विखे पाटील, अध्यक्ष, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांनी केले आहे. याबरोबरच सर्व दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी विखे पाटील मेमोरियल हॉस्पीटल अहिल्यानगर चे तज्ञ डॉक्टर अकोले येथे करणार असल्याचेही डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे. अकोले तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

