shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर–मनमाड महामार्गावर ४ हजार किलो प्रतिबंधित मांगुर मासा जप्त

२९ लाखांचा मुद्देमाल जप्त; चार जण ताब्यात

शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा | शिर्डी | दि. ३ मार्च २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने नगर–मनमाड महामार्गावर मोठी धडक कारवाई करत सुमारे ४ हजार किलो प्रतिबंधित मांगुर मासा जप्त केला. या कारवाईत अंदाजे २९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार केले होते. पथक अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत ट्रक क्रमांक WB25M5023 मधून केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेले मांगुर मासे नगर–मनमाड हायवेवरील निमगाव बायपास चौकातून जाणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, उपनिरीक्षक सागर काळे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निमगाव बायपास येथे सापळा रचून संबंधित ट्रक ताब्यात घेतला. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित मांगुर मासे आढळून आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांची नावे
स्वपन नियम डे (वय ३६, पश्चिम बंगाल)
मकबुल रौफ सरदार (वय ३१, पश्चिम बंगाल)
कुतुब आयुब मंडल (वय ३५, पश्चिम बंगाल)
मृत्युंजय मुकुल विश्वास (वय २७, पश्चिम बंगाल)
प्राथमिक चौकशीत सदर मासे पश्चिम बंगाल येथून भरून खोपोली–मुंबई येथे ‘भाई’ नावाच्या व्यक्तीकडे नेण्यात येत असल्याची माहिती आरोपींनी दिली.
यानंतर मत्स व्यवसाय विकास अधिकारी सौ. प्रतिक्षा सुधाकर पाटेकर यांना शिर्डी पोलीस ठाण्यात बोलावून माशांची खात्री करण्यात आली. त्यांनी संबंधित मासे प्रतिबंधित मांगुर असल्याचा अभिप्राय दिला. पोलिसांनी सुमारे ४ लाख रुपये किमतीचे ४ हजार किलो मासे व २५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेले मासे कायदेशीर प्रक्रियेनंतर नष्ट करण्यात आले.
या प्रकरणी Shirdi Police Station येथे गुन्हा रजिस्टर नं. १६०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३, २७५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा व शिर्डी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने केली असून, जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
close