शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह
शेवगाव | प्रतिनिधी
शेवगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कथित गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक पिळवणुकीच्या आरोपांनी तालुक्यात खळबळ उडाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शेवगाव तालुका वडार समाजाचे अध्यक्ष अशोक धनवडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
धनवडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव येथील दुय्यम निबंधक डी. टी. लंगोटे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाच्या महसुलाला मोठा फटका दिला असून, सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे गंभीर आरोप आहेत. जमिनींच्या नोंदणी प्रक्रियेत नियमबाह्य पद्धतीने व्यवहार करून शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तसेच, शेतजमिनींच्या तुकड्यांची नोंदणी करण्यास शासनाने बंदी घातलेली असतानाही केवळ आर्थिक फायद्यासाठी अनेक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. फॉरेस्ट जमीन, इनामी जमीन तसेच शासकीय निर्बंध असलेल्या जमिनींच्या व्यवहारांतही मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, जमिनीचे मूळ बाजारमूल्य कमी दाखवून शासनाचा महसूल बुडविण्याचा प्रकार सुरू असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा फटका बसत असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अशोक धनवडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोन महिन्यांच्या आत संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा सहकाऱ्यांसह मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
या प्रकरणामुळे शेवगाव तालुक्यात प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली असून, आता शासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

