जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
पुणे हे समाजसुधारकांचं आणि स्वातंत्र्य सैनिकांचं शहर म्हणून भारतात प्रसिद्ध आहे, पुणे हे आयटीचं शहर आणि पूर्वेचं ऑक्सफर्ड म्हणून पण प्रसिद्ध आहे. तसंच गेल्या काही वर्षात ते चितळ्यांच्या बाकरवडीसाठीही प्रसिद्ध पावलं आहे.
परवा पुण्यातील रांजे गावात चितळे बंधू मिठाईवाले यांच्या व्हिजन पार्कचं उद्घाटन होतं. २५ एकर अशा विस्तीर्ण जागेवर उभारलेल्या या व्हिजन पार्कवर संपूर्ण यंत्रचलित असं बाकरवडी, मिठाई आणि स्नॅक्सचं उत्पादन होणार आहे. याआधी इथेच बाकरवडीचं मशीनद्वारे उत्पादन होत होतंच पण आता वाढती मागणी बघता त्यांनी हे दुसरं उत्पादन युनिट उभारलं आहे.
१९७६ साली मूळ गुजराती असलेला बाकरवडी हा पदार्थ त्यात आपला महाराष्ट्रीयन पुडाची वडीचा काही भाग घेऊन एक नवीनच बाकरवडी हा पदार्थ राजाभाऊ चितळे यांनी बनवला. त्यांच्या कल्पनेतल्या पहिल्या बाकरवडीची रेसीपी घरी त्यांची वहिनी कै.सौ विजया चितळे आणि पत्नी कै. सौ. मंगला चितळे यांनी तयार केली. मग ती ग्राहकांसाठी बाजारात आणली गेली. हा पदार्थ ग्राहकांच्या फारच पसंतीस पडला. वाढता वाढता वाढे अशी ग्राहकांची मागणी वाढू लागली..रोज ७०० किलो बाकरवडीचं उत्पादनही पुरेना. तेव्हा त्यांनी मशीनने बाकरवडीचं उत्पादन करायचं ठरवलं पण अर्थातच चवीत कुठलीही तडजोड न करता…
मग मशीनची शोधाशोध सुरू झाली अर्थातच अशी कुठलीही मशीन बाजारात नव्हती मग तशी जाहिरात देण्यात आली. एक डच कंपनी त्यांच्याशी संपर्क साधला. कंपनीने पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं की, आम्ही बाकरवडी तयार करण्याचं मशीन तयार करण्याचा प्रयत्न करु. या प्रयत्नाचे १० लाख रुपये लागतील. मशीन तयार करण्यात आम्ही अयशस्वी ठरलो तरी १० लाख परत केले जाणार नाही. राजाभाऊ आणि रघुनाथराव चितळे या बंधुद्वयांनी विचार केला की काय करावं..कंपनी अयशस्वी झाली तर १० लाख गेले. आज २०२६ साली सुद्धा १० लाखाची किंमत किती आहे तर १९९० च्या दशकात ती किती असेल आपण कल्पना करु शकतो...
पण उदयोजक आणि इतर माणसं यात फरक हा आहे की, उदयोजक धोका पत्करतो. हा जुगार रघुनाथरावांनी आणि राजाभाऊंनी खेळायचं ठरवलं. आणि डच कंपनीशी करार केला. पुढे काही दिवसांनी कंपनीचं पत्र आलं की बाकरवडी तयार करणारी मशीन त्यांनी बनवली आहे. तीची ट्रायल घ्यायला या या तारखेला तुम्हाला यायचं आहे. पण थांबा कथा इथे संपत नाही...इथून पुढे सुरू होते...
राजाभाऊंचे सुपुत्र संजय उर्फ गोविंद चितळे आणि त्यांचे चुलतभाऊ अनंत नेदरलँडला गेले. युरोपातला देश वेळेचं महत्व म्हणून सकाळी नऊची वेळ दिली होती त्याच्या पंधरा मिनिटं आधीचं ते पोहोचले. पण नऊ वाजले, साडे नऊ वाजले, दहा वाजले, साडे दहा वाजले तरी कोणी येण्याची चिन्ह नाहीत. यांनी परत तारीख वेळ ठिकाण चेक केलं. सर्व काही तेच होतं. बरोबर होतं. तेवढ्यात एक माणूस धापा टाकत आला. त्याने जी बातमी दिली ती पायाखालची जमीन सरकवणारी होती. तो म्हणाला, की मशीन झाली होती पण ती फेल गेली. त्यात बिघाड आलाय. ती बाकरवडी तयार करु शकत नाही. संजयची त्यांचा चुलतभाऊ दोघं स्तब्ध झाले, हतबुद्ध झाले...१० लाख पाण्यात गेले होते, शिवाय भारतातून युरोपात जाण्यायेण्याचा खर्च वेळ सर्वच वाया गेलं होतं. तेवढ्यात त्यांच्या चुलतभावाला काय सुचलं तो म्हणाला कारखान्यात आम्हाला मशीन बघू तर दया. ते दोघं कारखान्यात गेले. त्यांनी मशीन चेक केली. आणि शेवटचा प्रयत्न केला. आणि मशीन सुरू झाली आणि बाकरवडी तयार करु लागली....प्रयत्ने वाळूचे...
तर अशी ही बाकरवडीच्या यांत्रिक उत्पादनाची कथा...आज चितळे बंधू मिठाईवाले रांजे इथल्या पार्कमध्ये ६० टन म्हणजे ६० हजार किलो बाकरवडीचं उत्पादन करतात.
३५ देशांमध्ये चितळे बंधूंची मिठाई, मोदक, स्नॅक्स, बाकरवडी जाते. गुणवत्ता आणि सचोटी ही चितळ्यांची वैशिष्ट्य...
चितळ्यांच्या पुणे आणि भिलवडी दोन्ही कंपन्यांनी सर्वात जास्त इन्कमटॅक्स भरल्याचा रेकॉर्ड आहे. शिवाय चितळ्यांची ग्राहकांप्रतीची बांधिलकी कमाल कमाल कमाल आहे. तब्येतीला हानीकारक अशा पाम तेलाचा बहुतांश कंपन्या वापर करत असताना चितळे मात्र १०० टक्के शेंगदाणा तेल आणि शुद्ध तुपाचा वापर आपले उत्पादन तयार करताना करतात.
त्यांनी ग्राहकांसाठी खास अशा हाताने तयार केलेल्या प्रिमीयम मिठाया तयार केल्या आहेत. ज्यांची आधी ऑर्डर दयावी लागते....१९५० साली १०० स्क्वेअर फूट जागेपासून सुरू झालेला हा प्रवास आज २५ एकर पर्यंत पोहोचला आहे. प्रवास म्हणण्यापेक्षा ८७ वर्षांची ही इमानाची यात्रा आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
या कार्यक्रमाचं निवेदन करताना खूपच छान वाटलं अर्थातच. वेळ कमी असल्यानं चितळे बंधू मिठाईवाले यांच्या तिसऱ्या पिढीचे श्री. श्रीकृष्ण चितळे यांचं भाषण रद्द झालं. माझ्यावरही तणाव होताच. कारण मुख्यमंत्र्यांना लगेच पुढे दुसरा कार्यक्रम होता. ऑलरेडी कार्यक्रम उशीरा सुरू झाला होता. अशावेळी आपण ठरवलेली स्क्रिप्ट कापावी लागते किंवा खूप बदलावी लागते. परत निर्णय घेणे...जे जबाबदारीचं आणि तणावाचही असतं.
आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इतक्या कार्यक्रमांचं निवेदन झालंय की त्यांना माझा चेहरा ओळखीचा झालाय. यावेळी कार्यक्रम संपल्यावर आवर्जून मुख्यमंत्र्यांनी विचारलं..काय म्हणते, कशी आहेस...
प्रश्न साधाच आहे पण तो कोण विचारतं हे महत्वाचं. मुख्यमंत्री राज्यातील सर्वात ताकदीचं पद..एका सर्वसामान्य निवेदकाची दखल घ्यायची त्यांना काय गरज....पण इथे त्यांचं माणूसपण, विनम्रता आणि humility दिसते. मी म्हटलं छान आहे..आणि आम्ही एक फोटो काढला...
निवेदन करताना किती माणसं भेटतात, किती किस्से आणि प्रसंग...वक्तृत्व या कलेबद्दल आणि ती माझ्या वडिलांनी मला शिकवली तेव्हा वडिलांबद्दल मी कृतज्ञच राहू शकते...

