shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोनई पोलिसांचा अवैध धंद्यांवर धडक कारवाईचा बडगादारू विक्री, मटका जुगार अड्ड्यांवर छापे; पाच गुन्हे दाखल, मुद्देमाल जप्त

 प्रतिनिधी मोहन शेगर सोनई 
नेवासा तालुक्यातील महिला सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत दारू विक्री व मटका जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पाच वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात अवैध दारू विक्री व मटका जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने गुन्हेगारी वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत होत्या. याची गंभीर दखल घेत वरिष्ठांच्या आदेशानुसार सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले.
दि. ११ मे रोजी घोडेगाव बसस्थानकासमोरील हॉटेल दिपक येथे विनापरवाना बेकायदा दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून विविध कंपन्यांची सुमारे २४ हजार ५६५ रुपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भगवान वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब सातपुते (वय ३४, रा. घोडेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १८०/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे करत आहेत.
याच दिवशी घोडेगाव येथील एका पत्र्याच्या टपरीमध्ये संभा हनुमंत बऱ्हाटे (वय ४२) हा कल्याण मटका नावाचा हारजीतीचा जुगार खेळताना व खेळविताना आढळून आला. पोलिसांनी ४६० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १७९/२०२६ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) प्रमाणे दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी करत आहेत.
तसेच चांदा येथे भानुदास गोटीराम शिंदे (वय ४५) हा पत्र्याच्या टपरीमध्ये मटका जुगार चालवत असल्याचे पोलिसांना आढळले. या ठिकाणाहून ८३० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल भगवान वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक १७८/२०२६ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे करत आहेत.
दरम्यान, सोनई-शनिशिंगणापूर मार्गावरील मुळा कारखाना परिसरातही पोलिसांनी गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई केली. आरोपी संतोष एकनाथ राठोड (वय ४२, रा. शारदा नगर, सोनई) हा एका टपरीमध्ये बेकायदा गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून १८०० रुपये किंमतीची १८ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल निखिल तमनर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक १७७/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब बाचकर करत आहेत.
याच परिसरात लक्ष्मण दामु हाटकर (वय २९, रा. मुळा कारखाना) हा देखील गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना मिळून आला. त्याच्याकडून १८०० रुपये किंमतीची १८ लिटर दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १७६/२०२६ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब लबडे करत आहेत.
सोनई पोलिसांनी केलेल्या सलग कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळातही अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी दिला आहे.
close