नेवासा तालुक्याच्या मातीतून उभा राहून स्वतःच्या कर्तृत्वाने संपूर्ण राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे मा. खा. यशवंतरावजी गडाख साहेब. “सोनई ते संसद” हा त्यांचा प्रवास केवळ राजकीय यशाची कहाणी नसून सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात परिवर्तन घडविणाऱ्या एका जिद्दी, दूरदृष्टीच्या आणि लोकाभिमुख नेतृत्वाचा प्रेरणादायी इतिहास आहे.
आज त्यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण नेवासा तालुका, अहिल्यानगर जिल्हा आणि राज्यभरातील असंख्य कार्यकर्ते, शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक,माता भनीनी,संत ,महंत साहित्यप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिक कृतज्ञतेने त्यांना शुभेच्छा देत आहेत.
गेल्या आठ दशकांपासून गडाख साहेबांनी समाजकारणाला केंद्रस्थानी ठेवून हजारो कुटुंबांच्या जीवनात आनंद, आत्मविश्वास आणि उभारी निर्माण केली. अनेकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आधार दिला, तर अनेक तरुणांना शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद दिली.
राजकीय वारसा किंवा मोठी पार्श्वभूमी नसतानाही केवळ ध्येय, मेहनत आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी मुळा सहकारी साखर कारखाना, मुळा एज्युकेशन सोसायटी आणि यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय यांसारख्या संस्थांची स्थापना केली. वयाच्या अवघ्या पंचविशीत सहकारी साखर कारखाना उभा करून त्यांनी देशभरातील तरुणांसमोर नवा आदर्श निर्माण केला.
गडाख साहेबांनी केवळ राजकारण न करता समाजकारण, शिक्षण, साहित्य, कृषी, पर्यावरण आणि ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रांत भरीव योगदान दिले. “देखणे ते हात त्या हातांना निर्मितीचे डोहळे” या उक्तीप्रमाणे त्यांचे संपूर्ण आयुष्य नवनिर्मितीच्या कार्याला वाहिले गेले आहे.
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे ते खरे वारकरी ठरले. त्यांच्या विचारसरणीचा वारसा जपत त्यांनी लोकाभिमुख नेतृत्वाची परंपरा कायम ठेवली. ९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन अहिल्यानगर येथे भरवून जिल्ह्याच्या साहित्य-सांस्कृतिक परंपरेला नवी दिशा दिली.
जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे अहिल्यानगरला उत्कृष्ट आयोजन करून जागतिक मराठी साहित्य संमेलनास नवा आयाम दिला.
शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा आणली. परिणामी आज अनेक विद्यार्थी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये, तर अनेक तरुण प्रशासकीय सेवांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत.
यशवंत स्टडी क्लब सोनई आणि यशवंत स्टडी सेंटर नेवासा यांच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची दर्जेदार तयारी करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. त्यातून अनेक अधिकारी घडले, अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली.
गडाख साहेबांच्या पुढाकारातून तालुक्यात वाचनालयांची चळवळ उभी राहिली. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागली. ज्ञान आणि विचारांची पेरणी करणारा हा उपक्रम त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतो.
पर्यावरण संवर्धनातही त्यांनी मोठे कार्य केले. लाखो झाडांची लागवड करून नेवासा तालुक्यात निर्माण झालेली हिरवाई त्यांच्या निसर्गप्रेमाची जिवंत ओळख बनली आहे.
गोरगरीब कुटुंबातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांनी “दत्तक पालक योजना” राबवून शेकडो मुलींचे पालकत्व स्वीकारले. अनेक मुलींचे भविष्य घडविण्यामागे त्यांचा मोलाचा वाटा आहे.
पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, लोकसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य ,जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन,राज्य सहकारी बँकेचे संचालक
यांसह विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी नेहमीच सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. १९७२ च्या भीषण दुष्काळात त्यांनी केलेल्या कामांमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला.
राजकीय जीवनात संकटे, विरोध आणि अडचणी आल्या; पण “उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही” या निर्धाराने त्यांनी जनसेवेचे शिवधनुष्य अखंड पेलले.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे माणुसकी. मोठ्या पदावर असूनही ते सामान्य कार्यकर्त्यांपासून शेतात काम करणाऱ्या मजुरांपर्यंत प्रत्येकाशी सहज संवाद साधतात. कुटुंबव्यवस्था जपत एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला.
लेखक, कवी गुलजार साहेबांपासून ते शरद पवार साहेबांसह राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांशी त्यांची असलेली मैत्री त्यांच्या व्यापक व्यक्तिमत्त्वाची प्रचिती देते.
आज वयाच्या ८३ व्या वर्षीही समाजासाठी काम करण्याची त्यांची ऊर्जा आणि तळमळ तरुणांनाही प्रेरणा देणारी आहे. “सोनई ते संसद” हा त्यांचा प्रवास म्हणजे संघर्ष, नवनिर्मिती, माणुसकी आणि विकासाचा सुवर्ण अध्याय आहे.
अशा या जनतेच्या आधारवडाला, असंख्य आयुष्यांचे “सोने” करणाऱ्या परिसस्पर्शी व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
८३ वर्षे जनसेवेची…
आदरणीय मा. खा. यशवंतरावजी गडाख साहेबांना उदंड आयुष्य लाभो!
शब्दांकन
राहुल राजळे
9527110809

