शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा:
क्रिकेट क्षेत्रातील मानसशास्त्र आणि खेळाडूंच्या सवयींवर प्रकाश टाकणाऱ्या 'क्रिकेटपटू श्रद्धाळू की अंधश्रद्धाळू ?' या नवीन पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. प्रसिद्ध लेखक, क्रिकेट विश्लेषक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. दत्ता विघावे यांनी या ग्रंथाचे लेखन केले आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री. भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्ताजी डोंगरे, श्री. विठ्ठलराव सोनवणे व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या पुस्तकात क्रिकेट विश्वातील श्रद्धा - अंधश्रद्धा यासारख्या गहन विषयावर प्रकाशझोत टाकला आहे. मैदानावरील खेळाडूंची एकाग्रता, त्यांच्या मनात असणारी अस्वस्थता आणि मानसिकतेचा खेळावर होणारा परिणाम याचा सखोल अभ्यास या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. विशेषतः 'मानसिक अस्वस्थता' आणि 'अंधश्रद्धा' या विषयांवर लेखकाने संशोधनात्मक लेखन केले आहे.
डॉ. दत्ता विघावे यांचे आतापर्यंत १३,००० हून अधिक लेख विविध प्रसार माध्यमात प्रसिद्ध झाले असून, क्रिकेट मधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 'डॉक्टर ऑफ लिटरेचर' (डि.लिट) ही पदवी देऊन गौरवण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. शिवाय अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले असून त्यांचे कवितासंग्रह व कथा संग्रहही प्रकाशित झाले आहेत. ऑस्ट्रेलिया, रशिया, अमेरिकेसारख्या देशांनीही त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन्मानीत केले आहे.
त्यांच्या या नवीन पुस्तकामुळे क्रिकेट प्रेमी आणि वाचकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. उपक्रमाच्या शेवटी खा. वाकचौरे यांनी डॉ. विघावे यांच्या लेखणीचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

