अहिल्यानगर जिल्ह्यात पत्रकारिता अनेकांनी केली, अनेकांनी नाव कमावले; पण ‘पत्रकारीतेचा गॉडफादर’ ही ओळख ज्यांनी स्वतःच्या धडाडीवर मिळवली, ते म्हणजे मनोजकुमार आगे. १९८३ साली सुरू झालेला हा प्रवास आज ६०व्या वर्षातही तितक्याच जोमाने सुरू आहे. चार दशकांपेक्षाही जादा अनुभव, असंख्य वादळे आणि संघर्ष झेलूनही न झुकणारी लेखणी – हीच मनोज आगे यांची खरी ओळख.
पत्रकारिता ही फक्त बातमी लिहिण्याची कला नाही, तर ती संघर्षाची रणभूमी आहे. आरोप-प्रत्यारोप, राजकीय दबाव, जनतेचा रोष, धमक्या, खोटे गुन्हे, ब्लॅकमेलिंगचे प्रयत्न – या सगळ्या दलदलीत उभा राहूनही ज्याने स्वतःला स्वच्छ ठेवले, तोच खरा पत्रकार. मनोज आगे यांनी ही कसोटी पार केली आहे.
“ब्लॅकमेलिंग आणि बाई या दोन गोष्टींपासून दूर राहिलात, तर पत्रकारितेत कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही,” ही त्यांची शिकवण आज अनेक नवोदित पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. अन्यायाविरुद्ध उभं राहताना ते कधीच मागे हटले नाहीत. उलट, “चुकीचा आरोप झाला तर तिथेच उत्तर द्या; आणि गरज पडली तर पेन बाजूला ठेवून दांडाही हातात घ्या,” हा त्यांचा आक्रमक स्वभाव अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
त्यांच्या या डॅशिंग शैलीमुळेच श्रीरामपूर तालुक्यात त्यांना ‘पत्रकारीतेतील गॉडफादर’ म्हणून ओळख मिळाली. त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लेखणी चालवली, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला आणि राजकीय समीकरणे बदलण्याची ताकदही दाखवून दिली. त्यांच्या एका बातमीने अनेकदा सत्ताधाऱ्यांचे डोकेदुखी वाढले, तर सामान्य माणसाला दिलासा मिळाला.
मनोज आगे यांच्या पत्रकारितेची मुळेही तितकीच मजबूत आहेत. त्यांचे वडील शंकरराव आगे हेही हाडाचे पत्रकार होते. त्यांच्या संस्कारातूनच पुढे आलेली ही निर्भीड वृत्ती आजही कायम आहे. वडिलांकडून मिळालेलं बाळकडू आणि स्वतःची जिद्द यामुळेच त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला.
विशेष म्हणजे, वयाची साठी गाठूनही त्यांची ऊर्जा आजच्या तरुणांनाही लाजवेल अशी आहे. ना कोणताही आजार, ना थकवा – फक्त समाजासाठी लढण्याची जिद्द आणि सत्य मांडण्याची हिंमत. आजही ते त्याच आक्रमकतेने आणि स्पष्टवक्तेपणाने पत्रकारिता करत आहेत.
आज त्यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त, अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकारितेला दिशा देणाऱ्या या ‘गाॅडफादर’ला मानाचा मुजरा. त्यांच्या लेखणीची धार अशीच तीक्ष्ण राहो आणि अन्यायाविरुद्धचा आवाज अधिक बुलंद होवो, हीच शुभेच्छा.
शुभेच्छुक :
अनिल कोळसे पाटील
संपादक – दैनिक सार्वमंथन

