जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
मराठी जगताचे वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे इच्छात प्रख्यात कवी आणि साहित्यिक ग. दि. उपाख्य अण्णा माडगूळकर यांच्या कुटुंबीयांमध्ये अण्णांचे निवासस्थान असलेल्या पंचवटी या बंगल्यावरुन सध्या सुरू असलेला वाद आधी समाजमाध्यमांवर आला, आणि आता तो वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांमध्ये देखील प्रकाशित झाला आहे. झालेला प्रकार एकूणच दुर्दैवी असून गदिमांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य मराठी माणसांना अनंत वेदना देणारा ठरलेला आहे.
अण्णा हे ख्यातनाम कवी होते. त्यांनी रचलेले गीतरामायण ही एका काळात घराघरात पोहोचले होते आणि त्याने प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर केले होते. हे गीत रामायण ऐकत काही पिढ्या घडवल्या गेल्या. त्यातल्याच एका पिढीचा प्रतिनिधी मी देखील आहे, आणि अण्णांच्या काव्यरचनांवर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांपैकी मी एक आहे. त्यामुळे मलाही झाल्या प्रकाराच्या तीव्र वेदना झालेल्या आहेत.
अण्णांच्या गीतरामायणाने आम्हाला लहानपणीच वेडे केले होते. मला आठवते १९६६ साली सातव्या वर्गात शिकत असताना नागपूरच्या आमच्या शाळेत हडस हायस्कूल मध्ये अण्णा आले होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसमोर लालबहादूर शास्त्रींच्या काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांच्या ओघवत्या बोलण्याने आम्ही चांगलेच प्रभावित झालो होतो.त्यानंतर त्यांना भेटून त्यांची स्वाक्षरी घेतल्याचेही मला आठवते.
नंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना नागपूर युवक केंद्र नामक युवक चळवळीत मी सक्रिय होतो. या संघटनेतर्फे एक साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले होते. तेव्हा अण्णांना नागपूरला बोलवावे असा आमचा विचार होता. त्यासाठी त्यांचा आकाशवाणीतून पत्ता मिळवून त्यांना आम्ही पत्र देखील टाकले. मात्र तो योग येऊ शकला नव्हता.
२००२ ते २०११ या कालखंडात "रामटेकच्या गडावरून" या शीर्षकाने मी एक दिवाळी अंक प्रकाशित करीत असे. २००५ मध्ये गीतरामायणाला पन्नास वर्षे झाली होती. त्यावर्षी जुलै महिन्यात मुंबईत विधानभवनात अचानक उल्हासदादा पवार यांच्या समवेत अण्णांचे चिरंजीव श्रीधर माडगूळकर यांची भेट झाली होती. मग मी त्यांच्या गळीच पडलो आणि त्यांच्याकडून दिवाळी अंकासाठी गीत "रामायणाची पन्नास वर्षे" या विषयावर लेखही घेतला होता. नंतर काही वेळा त्यांचे माझे बोलणेही झाले होते.
२०२० च्या डिसेंबर मध्ये पुण्यातील माझे साहित्यिक मित्र प्रदीप निफाडकर यांचा फोन आला आणि गदिमांचे स्मारक उभारण्यासाठी शासन करीत असलेली दिरंगाई लक्षात घेता पुण्यात ते गदिमांच्या कविता वाचून आंदोलन करणार होते. तसेच आंदोलन नागपुरात आयोजित व्हावे अशी त्यांची इच्छा होती. मग गदिमा संदर्भातील माझी आस्था लक्षात घेत मीच पुढाकार घेतला, आणि नागपुरात वझलवारांच्या केशव भवन मध्ये आम्ही कोरोना काळ असताना देखील एक तासाचा कविता वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला कोरोना काळात देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्या दिवशी विविध वृत्तवाहिन्यांशी बोलताना मी अण्णांचे स्मारक पुण्यात सरकारने लवकरात लवकर उभारावे यासाठी आग्रह धरला होता.
काल अचानक अण्णांचे नातू सुमित्र माडगूळकर यांची एक पोस्ट व्हाट्सअप आणि फेसबुक वर वाचण्यात आली. ती वाचून धक्काच बसला. त्यांचे कुटुंबीय अण्णांनी मुंबई पुणे हायवे वरील त्यांच्या ज्या पंचवटी या बंगल्यात बसून असंख्य काव्यरचना केल्या, तो बंगला आता कुटुंबीय विकण्याच्या बेतात आहेत असा गौप्यस्फोट सुमित्र माडगूळकरांनी केला होता. त्यात त्यांनी आपण विरोध करत असल्यामुळे आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा काही आरोप केला होता. मग काल रात्री एबीपी माझा ने देखील ही बातमी दाखवली. त्यात सुमित्र आणि त्यांच्या सौभाग्यवतींचाही बाईट दाखवला होता.
त्या पाठोपाठ आज सकाळी सुमित्र माडगूळकर यांच्या मातोश्री म्हणजेच श्रीधर माडगूळकर यांच्या पत्नी शितल माडगूळकर यांचीही एक पोस्ट वाचण्यात आली. त्यात त्यांनी सुमित्रलाच पंचवटी बंगला विकायचा आहे आणि त्यात तो बिल्डरशी सौदा करू बघतो आहे असा आरोप केला होता. त्यांनी त्यात इतरही बरेच आरोप सुमित्र माडगूळकरांवर केले होते.
मग मी सकाळी पुण्यात प्रदीप निफाडकर यांना फोन केला. त्यानंतर श्रीधर माडगूळकरांचे मित्र असलेले माझेही ज्येष्ठ स्नेही उल्हास दादा पवार यांच्याशीही मी बोललो. मी दूरदर्शन मध्ये काम करत असताना असलेले माझे सहकारी आणि कौटुंबिक मित्र किशोर जोगळेकर हे अण्णांचे धाकटे जावई आहेत. त्यांनाही मी फोन केला आणि त्यांच्याशीही बोलणे झाले. मग त्यांच्याकडून मी अण्णांचे दुसरे चिरंजीव आनंद माडगूळकर आणि सुमित्रच्या आई शीतल माडगूळकर यांच्याशी फोनवर बोललो. सर्वांशी बोलल्यावर एकूणच हा कौटुंबिक वाद असल्याचे लक्षात आले. या सर्वांचा सुमित्र माडगूळकरांवरच आरोप होता आणि तेच बिल्डरला ही इमारत विकत आहेत असा दावा होता. वस्तूतः हा वाद असा चव्हाट्यावर यायला नको होता. तो वाद समाज माध्यमावर आल्यामुळे आणि नंतर वृत्तवाहिन्या तसेच वृत्तपत्रे यांनीही प्रसिद्ध केल्यामुळे त्याला एक विपरीत वळण तर लागणार नाही ना असेही चित्र निर्माण झाले आहे. आज याच प्रकारात फेसबुक वर साहित्य क्षेत्रातील आणखी काही मान्यवरांच्या देखील प्रतिक्रिया या संदर्भात आल्या आहेत.
आता हा कौटुंबिक वाद असल्यामुळे कोण चूक कोण बरोबर या वादात मी जाणार नाही. मात्र ग दि माडगूळकर उपाख्य अण्णा हे सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे जिथे बसून त्यांनी मराठी जनमानसाला वेड लावणाऱ्या असंख्य काव्यरचना केल्या ते त्यांचे निवासस्थान पंचवटी त्यांचे चिरंतन स्मारक म्हणून जपले जायला हवे असे माझे मत आहे. राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात जे अमूल्य योगदान दिले ते बघता जिथे त्यांच्या जीवनाचा अंत झाला ते त्यांचे सावनेर येथील निवासस्थान आता त्यांचे स्मारक म्हणून जपले गेले आहेच ना. मग या.स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवारांचे निवासस्थान असो, की बाबासाहेब आंबेडकरांचे, सासवड येथील आचार्य अत्रेंचे निवासस्थान असो, की केशवसुतांचे कोकणातील निवासस्थान, ही सर्वच निवासस्थाने स्मारके म्हणूनच जपली गेली आहेत ना. तसेच अण्णांचे निवासस्थान सुद्धा त्यांचे चिरंतन स्मारक म्हणून जपले जायला हवे असे माझे मत आहे. पंचवटी ही वास्तू आज मुंबई पुणे हायवेवर आहे. त्यामुळे त्या जागेला आज करोडोंची किंमत येईल आणि अण्णांच्या सर्वच कुटुंबियांना मालामाल करुन जाईल. त्यासाठी मग कोणी काय वाटा घ्यायचा म्हणून कदाचित भांडणेही होतील. तिथे पंचवटी पाडून एखादा मॉल किंवा टॉवर किंवा कॉम्प्लेक्स उभारला जाईल. मात्र महाराष्ट्राच्या या वाल्मिकीची ही शेवटची आठवण कायमची धराशयी केली जाईल. हे कितपत योग्य वाटते याचाच आपण विचार करायला हवा.
मला मिळालेल्या माहितीनुसार अण्णांच्या परिवाराशी जवळीक असलेले पुण्यातील काही मान्यवर त्यात उल्हासदादा पवार, डॉ. उल्हास बापट, निवृत्त पोलीस महासंचालक अजित पारसनीस अशा हितसंबंधीयांनी सर्व कुटुंबीयांना एकत्र बसवून मार्ग काढण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यात त्यांना यश यावे हीच माझ्यासारख्या असंख्य साहित्यप्रेमींची मनापासून इच्छा आहे. माझ्या मते सरकारने ते निवासस्थान अधिग्रहित करावे आणि त्यात समाजातील अण्णांवर प्रेम करणाऱ्या साहित्य प्रेमींनी देखील हातभार लावावा, आणि त्या ठिकाणी अण्णांच्या कुटुंबीयांना योग्य तो मोबदला देऊन तिथे अण्णांचे चिरंतन स्मारक केले जावे. तसे झाले तर पुढल्या अनेक पिढ्या गीतरामायण आठवतील आणि मुंबई पुणे हायवेवरील "पंचवटी" येथे जाऊन अण्णांच्या स्मृती जागवतील, आणि त्यांच्या कर्तृत्वापासून प्रेरणा घेतील, हे निश्चित. यासाठी सरकारवर दबाव आणता यावा म्हणून अण्णांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या साहित्यप्रेमींनीच पुढाकार घ्यायला हवा आणि त्यासाठी एकत्रित येऊन हालचाली करायला हव्यात इतकेच इथे सुचवावेसे वाटते.
अर्थात हे माझे मत झाले.....
आपणही याबाबतीत आपली मते व्यक्त करू शकता.....

