shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचे शनिशिंगणापुरात दर्शन; ‘शनि जयंती-शनी अमावस्येच्या निमित्ताने घेतला आशीर्वाद’

सोनई /प्रतिनिधी मोहन शेगर सोनई 
प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी गुरुवारी अचानक शनिशिंगणापूर येथे भेट देत भगवान शनिदेवांचे दर्शन घेतले. शनि जयंती आणि शनी अमावस्या एकाच दिवशी आल्याने शनि देवाच्या दर्शनाची तीव्र इच्छा झाल्याचे त्यांनी सांगितले. दुपारी  दोन वाजण्याच्या सुमारास त्या शनिशिंगणापूर येथे दाखल झाल्या आणि पारंपरिक पद्धतीने १० किलो तेल शनि देवाला अर्पण करून चौथऱ्याच्या खालूनच शनि दर्शन घेतले.त्यांच्या अचानक भेटीमुळे देवस्थान परिसरात उत्सुकता निर्माण झाली होती. दर्शनानंतर त्यांनी शनिश्वर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी त्यांचा सन्मान केला.
यावेळी बोलताना अनुराधा पौडवाल यांनी शनि भक्तीशी असलेल्या आपल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “शनि देवावरील भजने, गीते आणि ‘सूर्यपुत्र शनिदेव’ या हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत स्वर्गीय बाबुराव बनकर यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आम्हाला हे कार्य करता आले. आज शनिशिंगणापूरला जी राष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्धी मिळाली, त्यात त्यांचाही मोठा वाटा आहे.”

यावेळी राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील सयाराम बनकर, जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. देवस्थानकडून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांची माहिती अतुल चोरमारे यांनी दिली. ही माहिती ऐकल्यानंतर समाधान वाटल्याची भावना अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केली.श्रद्धा, परंपरा आणि साधेपणाचा अनोखा संदेश
अनुराधा पौडवाल यांची शनिशिंगणापूर भेट ही केवळ एका सेलिब्रिटीची धार्मिक भेट नव्हती, तर ती भक्तीतील साधेपणाचा संदेश देणारी ठरली. अनेक मान्यवर विशेष सुविधा अथवा प्रोटोकॉलची अपेक्षा करतात; मात्र अनुराधा पौडवाल यांनी नेहमीप्रमाणे चौथऱ्यावर जाण्याचा आग्रह न धरता खाली उभे राहून दर्शन घेतले. त्यामुळे त्यांच्या श्रद्धेतील साधेपणा आणि शनि भक्तीतील प्रामाणिकपणा पुन्हा अधोरेखित झाला.
शनि जयंती आणि शनी अमावस्या या दुर्मीळ योगाच्या पार्श्वभूमीवर त्यांची उपस्थिती भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरली. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही अशा भेटींमुळे शनिशिंगणापूरचे महत्त्व अधिक दृढ होत असल्याचे मानले जात आहे.
            : तीन दशकांची अखंड शनि भक्ती
१९९१ पासून अनुराधा पौडवाल सातत्याने शनिशिंगणापूर येथे येत आहेत. विशेष म्हणजे इतक्या वर्षांत त्यांनी कधीही चौथऱ्यावर जाण्याचा आग्रह धरला नाही. त्या नेहमी चौथऱ्याखालूनच शनि दर्शन घेतात. शनि भक्तीवरील त्यांच्या भजनांनी आणि गायनाने शनिशिंगणापूरला देशभरात वेगळी ओळख मिळवून देण्यात मोठा वाटा उचलल्याचे मानले जाते.
close