१५ मे रोजी सकाळी 8-30 वाजता विविध शासकीय विभागांचे अधिकारी राहणार उपस्थित..
सोनई | प्रतिनिधी मोहन शेगर
महसूल विभागामार्फत ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या दैनंदिन प्रशासकीय अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी सोनई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर १५ मे २०२६ रोजी सकाळी 8--30 वाजता विश्वलक्ष्मी मंगल कार्यालय, आंबेडकर चौक, सोनई येथे पार पडणार असून परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून नागरिकांच्या तक्रारी, महसुली कामे व शासकीय योजनांशी संबंधित प्रश्नांचे निराकरण गावपातळीवर करण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना विविध कार्यालयांचे हेलपाटे टाळून एकाच ठिकाणी आवश्यक सेवा व मार्गदर्शन मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार डॉ. संजय बिरादार, अप्पर तहसीलदार सोनाली म्हात्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी सहभागी होणार आहेत.
शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित विविध कामे, नागरिकांच्या तक्रारी, दाखले, जमीन विषयक प्रश्न, शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.
या शिबिराचे आयोजन मंडळ अधिकारी सोनई तसेच सर्व ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांनी केले असून नागरिकांनी आपल्या समस्या, कागदपत्रे आणि अर्जांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

