गर्भलिंग चाचणी प्रकरणात आणखी तिघांना अटक
राहाता (प्रतिनिधी) – राहाता तालुक्यात लोणी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गर्भलिंग चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता १६ वर पोहोचली असून, त्यामध्ये तब्बल पाच डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
या प्रकरणात यापूर्वी तीन डॉक्टर, चार एजंट तसेच सहा गर्भवती महिलांच्या नातेवाईकांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आतापर्यंत तपासात गर्भलिंग निदानासाठी वापरली जाणारी दोन बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन जप्त केली आहेत. त्यातील एक मशीन नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील आरोपी डॉ. राहुल भणगे यांच्या कडून तर दुसरे मशीन अटक आरोपी रवींद्र ढगे याच्या कडून हस्तगत करण्यात आले आहे.
तपासादरम्यान ही दोन्ही मशीन कोणत्याही अधिकृत नोंदणीशिवाय वापरली जात असल्याचे उघड झाले आहे. या मशीनचा वापर दीर्घकाळापासून सुरू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, त्यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, मशीन पुणे जिल्ह्यातील दोन डॉक्टर व एका व्यक्तीकडून खरेदी केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचत उशिरा तिघांना ताब्यात घेतले. यामध्ये डॉ.आकाश सुभाष मलगुंडे (शिरूर, जि. पुणे), डॉ. नीलकंठ अशोक जाधव (लोहगाव, जि. पुणे) आणि नरेंद्र साहेबराव ठाकरे (केसनंदगाव, हवेली) यांचा समावेश आहे.
तिन्ही आरोपींना लोणी पोलिस ठाण्यात आणून संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यांना राहाता न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आता या आरोपींनी ही प्रतिबंधित मशीन नेमकी कुठून आणली, त्यामागे आणखी कोणते जाळे कार्यरत आहे का, तसेच इतर डॉक्टर किंवा दलालांचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
राज्यात गर्भलिंग चाचणीवर कायद्याने कठोर बंदी असतानाही अशा प्रकारचे प्रकार सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित काही व्यक्ती आर्थिक फायद्यासाठी कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे या प्रकरणामुळे स्पष्ट झाले असून, सामाजिक स्तरावरही संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणाचा तपास अहिल्यानगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक एम. सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती व लोणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे हे करत आहेत. पोलिसांकडून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

