नेहमी रविवारचा दिवस भारतीय क्रिकेटमध्ये आनंद घेऊन येत असतो परंतु या वेळी मात्र तो दुःखाचा डोंगर कोसळवणारा ब्लॅक संडे ठरला. विश्वविजेतेपद मिळवून प्रथमच आयर्लंड दौऱ्यावर गेलेला भारतीय पुरुष संघ दोन सामन्यांच्या मालिकेत अतिशय वाईट खेळला व तुलनेने कमजोर संघा कडून व्हाईट वॉश घेतला. तर महिलांच्या टि २० संघालाही आपला टेंपो न राखता आल्याने उपांत्य फेरीच्या स्वप्नांना तिलांजली द्यावी लागली.
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने आपल्या गोलंदाजांच्या जोरावर भारताला एका धावेने पराभूत केले. आयर्लंडने टी२० विश्वविजेत्या भारताला दोन सामन्यांच्या मालिकेत २-० ने हरवले. हा आयर्लंडचा भारतावरील पहिला मालिका विजय होता. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने आपल्या २० षटकांत आठ गडी गमावून १५४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ आपल्या २० षटकांत नऊ गडी गमावून केवळ १५३ धावाच करू शकला. श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाखालील भारताची ही पहिलीच मालिका होती आणि भारताची कामगिरी निराशाजनक होती.
टी२० विजयाची मालिका खंडित
ऑगस्ट २०२३ पासून भारताने किमान दोन सामन्यांची एकही टी२० आंतरराष्ट्रीय मालिका गमावली नव्हती. १८ ऑगस्ट २०२३ ते ३१ जानेवारी २०२६ पर्यंत भारताने किमान दोन सामन्यांची एकही द्विपक्षीय टी२० आंतरराष्ट्रीय मालिका गमावली नव्हती. आयर्लंडने टी२० विश्वविजेत्या भारताची विजयाची मालिका खंडित केली. एवढेच नाही तर, भारताच्या सलग १६ मालिका विजयांची मालिकाही संपुष्टात आली. सलग दुसऱ्या सामन्यात भारताची फलंदाजी अत्यंत खराब झाली.
जय मुंद्राची दमदार कामगिरी
भारतीय वंशाचा वेगवान गोलंदाज जय मुंद्राने आयर्लंडसाठी दमदार कामगिरी केली. मुंद्राने पहिल्याच षटकात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांना शून्यावर बाद केले आणि त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरला त्रिफळाचीत केले. सुरुवातीलाच तीन विकेट गमावल्याने भारतीय फलंदाजांवर दबाव आला. यामुळे जलद धावा करण्याच्या प्रयत्नात ईशान किशन धावबाद झाला. आयर्लंडविरुद्ध पॉवरप्लेमध्ये भारताने चार विकेट गमावण्याची ही पहिलीच वेळ होती. भारताने पॉवरप्लेमध्ये चार गडी गमावून ४१ धावा केल्या, जी आयर्लंडविरुद्ध पहिल्या सहा षटकांतील त्यांची दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.
तिलक वर्माचे अर्धशतक
सतत विकेट पडत असताना, तिलक वर्माने एका टोकाकडून संघाला सावरले. सामन्यादरम्यान पाऊसही आला, त्यामुळे थोड्या वेळासाठी खेळ थांबवावा लागला. षटकं कमी न करता सामना पुन्हा सुरू झाला, पण भारताची खराब फलंदाजी सुरूच राहिली. तिलकने अक्षर पटेलसोबत ३९ धावांची भागीदारी केली, जी सामन्यातील संघाची सर्वोच्च भागीदारी होती. पावसानंतर सामना पुन्हा सुरू झाल्यावर अक्षर बाद झाला. भारताचा निम्मा संघ ७४ धावांवर परतला होता. त्यानंतर तिलक यांनी वेग वाढवला आणि काही मोठे फटके मारले. शिवमनेही फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, पण तोही बाद झाला. त्यानंतर तिलक यांनी ४५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले, पण पुढच्याच चेंडूवर ते बाद झाले. तिलक यांनी तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४६ चेंडूंमध्ये ५५ धावा केल्या.
हर्षितचे प्रयत्न व्यर्थ ठरले.
तिलक बाद झाल्यानंतर, पदार्पण करणारा सूर्यांश शेडगेही स्वस्तात बाद झाला. तोपर्यंत सामना भारताच्या हातून पूर्णपणे निसटत असल्याचे दिसत होते, पण हर्षित राणाने शेवटच्या षटकात सामन्याचे चित्र पालटण्याचा प्रयत्न केला. आयर्लंडने हॅरी टेक्टरला शेवटचे षटक टाकण्यासाठी पाठवले. भारताला विजयासाठी सहा चेंडूंमध्ये २० धावांची गरज होती. पहिला चेंडू वाईड होता आणि अर्शदीपने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत स्ट्राईक हर्षितकडे सोपवली. हर्षितने दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या, पण तो नो-बॉल होता. त्यानंतर हर्षितने फ्री हिटवर चौकार मारला. हर्षितने आणखी एक धाव घेतली आणि स्ट्राईक पुन्हा अर्शदीपकडे आली. टेक्टरने पुढचा चेंडू वाईड टाकला आणि अर्शदीपने चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. टेक्टरने फुलटॉस टाकला आणि हर्षितने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो सीमारेषेवर झेलबाद झाला. भारताला शेवटच्या चेंडूवर आठ धावांची गरज होती आणि प्रिन्स यादवने षटकार मारला. अशाप्रकारे, आयर्लंडने एका धावेने सामना जिंकला.
भारताचा डाव
दुसऱ्या टी२० सामन्यात भारताला तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांची साथ मिळाली, त्याने २० धावा केल्या. हर्षित राणाने शेवटच्या षटकात जोरदार फलंदाजी करत संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला, पण शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. हर्षित १० चेंडूंमध्ये २१ धावा करून बाद झाला, ज्यात दोन चौकार आणि एक षटकार होता. आयर्लंडकडून जय मुंद्रा आणि मॅथ्यू हॉलार्ड यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर मॅथ्यू हम्फ्रे आणि हॅरी टेक्टर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. नेेेह षटकार मारण्यात आघाडीवर असलेल्या भारतीय संघाने आपला पहिला षटकार डावाच्या अठराव्या षटकार मारला. यावरून आयरीश गोलंदाजांचा दरारा लक्षात येतो. भारताचे दोन धडाडीचे सलामीवीर संजू व अभिषेक शुन्यावर बाद झाले.
खराब सुरुवातीनंतर टेक्टरने संघाला सावरले
यापूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी ४८ धावांत तीन गडी गमावले. त्यानंतर हॅरी टेक्टरने बेंजामिन क्लाइटजेनसोबत चौथ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. मात्र, शिवम दुबेने सलग दोन चेंडूंवर दोन बळी घेत ही भागीदारी तोडली. यामुळे आयर्लंडला अपेक्षित धावसंख्या गाठता आली नाही. मात्र, टेक्टरने अर्धशतक पूर्ण करून संघाला एक आव्हानात्मक धावसंख्या गाठण्यास मदत केली. आयर्लंडकडून टेक्टरने सर्वाधिक ५३ धावा केल्या, तर बेंजामिन क्लेटिगेने ३७ धावा केल्या.
प्रिन्सचे संस्मरणीय पदार्पण
भारताने या सामन्यासाठी संघात दोन बदल केले आणि प्रिन्स यादव व सूर्यांश शेडगे यांना पदार्पणाची संधी दिली. प्रिन्सचे पदार्पण संस्मरणीय ठरले, कारण त्याने तीन बळी घेतले. नुकताच अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलेल्या प्रिन्सने चार षटकांत २२ धावा देऊन तीन बळी घेतले. त्याने मागील सामन्याचा नायक लॉर्कन टकरला यष्टीमागे इशान किशनकरवी झेलबाद केले. अर्शदीप सिंग आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हर्षित राणाने एक बळी घेतला.
महिला विश्वचषकातून टिम इंडिया बाहेर
२०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकातील भारतीय महिला संघाचा प्रवास साखळी फेरीतच संपला. सहा वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाने रविवारी लॉर्ड्सवर झालेल्या आपल्या शेवटच्या गट सामन्यात भारताला सहा गडी राखून पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला पराभूत करून अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवणे आवश्यक होते, परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यातील दबावाला संघ तोंड देऊ शकला नाही.
ऑस्ट्रेलिया गट १ मध्ये अव्वल
या विजयासह, ऑस्ट्रेलियाने गट 'अ' मध्ये आपला सलग पाचवा विजय नोंदवला आणि १० गुणांसह अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दरम्यान, दक्षिण आफ्रिका आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिली. भारताने पाच सामन्यांत तीन विजय आणि दोन पराभवांसह सहा गुण मिळवले, परंतु अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी हे पुरेसे नव्हते.
हरमनप्रीतच्या कप्तानी खेळीनंतरही, त्यांना १७० धावांचा बचावही करता आला नाही.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. सलामीवीर स्मृती मंधाना (३८) आणि शेफाली वर्मा (३४) यांनी पहिल्या विकेटसाठी ६६ धावा जोडून एक मजबूत पाया रचला. तथापि, दोन्ही फलंदाजांना आपल्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जने ३४ धावा केल्या, पण तिची खेळी तुलनेने संथ होती. शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या २७ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या. तिने आपल्या खेळीत शानदार षटकार आणि चौकार मारले, आणि शेवटच्या षटकातील सलग तीन षटकारांमुळे भारताला २० षटकांत चार गडी गमावून १७० धावांची सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. ऑस्ट्रेलियासाठी सोफी मोलिन्यूक्स सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली, तिने दोन बळी घेतले.
भारतीय गोलंदाजांनी आशा दाखवली, पण नंतर पेरी -गार्डनरने सामन्याचे चित्र पालटले.
१७१ धावांचे लक्ष्य गाठताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक धक्के देत त्यांना तीन गडी गमावून ६८ धावांवर रोखले. सलामीवीर फोबी लिचफिल्ड, जॉर्जिया वोल आणि अनुभवी बेथ मूनी स्वस्तात बाद झाल्या. मात्र, त्यानंतर अनुभवी एलिस पेरी आणि अष्टपैलू ॲशले गार्डनर यांनी भारतीय गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. त्यांनी चौथ्या विकेटसाठी शानदार १०० धावांची भागीदारी रचून सामना पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या बाजूने फिरवला. पेरीने ३८ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या, तर गार्डनरने अवघ्या २९ चेंडूंमध्ये ५३ धावांची नाबाद स्फोटक खेळी केली. ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले आणि एक षटक शिल्लक असताना सामना जिंकला.
दक्षिण आफ्रिकेनेही अंतिम चारमध्ये स्थान मिळवले.
गट 'अ' च्या दुसऱ्या सामन्यात, दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला चार गडी राखून पराभूत करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. या निकालामुळे भारताच्या आशा पूर्णपणे संपुष्टात आली. महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीसाठी चार संघ पात्र ठरले आहेत. ऑस्ट्रेलिया (गट अ विजेता), दक्षिण आफ्रिका (गट अ उपविजेता), इंग्लंड (गट ब विजेता), न्यूझीलंड (गट ब उपविजेता).
भारतासाठी निराशाजनक शेवट
भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करण्यात अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार सुरुवात करूनही, संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. गोलंदाजांनी सुरुवातीलाच बळी मिळवून पुनरागमनाची आशा निर्माण केली होती, परंतु एलिस पेरी आणि ॲशले गार्डनर यांच्यातील शानदार भागीदारीने भारताच्या उपांत्य फेरीच्या आशांवर पाणी फेरले. यासह, भारतीय महिला संघाचा विश्वचषक प्रवास गट फेरीतच संपुष्टात आला.
या दोन्ही पराभवानंतर हवेत तरंगणाऱ्या भारतीय क्रिकेटला धाडकन जमिनीवर कोसळल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता मात्र यावर तातडीने इलाज करण्याची वेळ आली असून वेळीच तोडगा काढावा नाही तर हा आजार बळावत जाईल.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो.नं. ९०९६३७२०८२.

