shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर मंत्रालयातील बैठक आशादायी

न्याय हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा समाजनेत्यांचा निर्धार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सकारात्मक आश्वासन

मुंबई, दि. १२ ऑगस्ट (प्रतिनिधी): वडार समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मुंबई येथील मंत्रालयात महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात मंगळवारी (दि. १२ ऑगस्ट) दुपारी २.४५ वाजता महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वडार समाजाच्या विविध मागण्या, अडचणी आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. शासनस्तरावर तातडीने आणि सकारात्मक कार्यवाही करण्याबाबत महसूलमंत्र्यांनी समाधानकारक आश्वासन दिल्याने ही बैठक समाजासाठी आशादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




या बैठकीस ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे अध्यक्ष विजयदादा चौगुले, वडार एकता परिषदेचे अभ्यासक भरत विटकर, वर्धा जिल्हाध्यक्ष सुरज पिटेकर, शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे सोशल मीडिया राज्यप्रमुख संजय कुसळकर, कार्याध्यक्ष सुरेश धोत्रे, उपाध्यक्ष शंकर चौगुले, तसेच राजू धोत्रे, राजेश अलकुंटे, यशवंत लष्करे, सुधीर पवार, राजू सांडू, रामू लष्कर, विठ्ठल कासवकर, यल्लाप्पा कुसळकर, प्रकाश पवार, चंदू पवार, राजू सूर्यवंशी, राजू लष्कर, नितीन पिटेकर, महेश मंजुळकर, कैलास देवतळे, शंकर धोत्रे, दिलीप गुंजाळ, शिवाजी ननवरे आदी समाजनेते व पदाधिकारी उपस्थित होते. वर्धा जिल्हाधिकारी दृकश्राव्य (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) माध्यमातून बैठकीला सहभागी झाले होते. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारीही या चर्चेत सहभागी झाले.

प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा

बैठकीत वडार समाजाच्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्यामध्ये जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेली १९६१ पूर्वीच्या पुराव्याची अट शिथिल करणे, पारंपरिक दगड उत्खनन व वाहतुकीसाठी मिळणारी २०० ब्रास रॉयल्टीची मर्यादा वाढवून ५०० ब्रास करणे, वडार समाजातील नागरिकांची अतिक्रमणे नियमानुकूल करणे, तसेच बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता.

याशिवाय महसूल विभागाशी संबंधित विविध स्थानिक समस्या, प्रशासकीय अडचणी आणि समाजाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या इतर प्रलंबित प्रश्नांवरही मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.

पाठपुरावा अधिक तीव्र करण्याचा निर्धार

बैठकीदरम्यान उपस्थित समाजनेत्यांनी या मागण्या केवळ कागदोपत्री न राहता त्यावर शासनस्तरावर तातडीने आणि सकारात्मक कार्यवाही व्हावी, यासाठी सातत्याने आणि संघटित पद्धतीने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला. वडार समाजाच्या न्याय हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला अधिक बळ देणारी आणि समाजाच्या संघटित प्रयत्नांना नवी दिशा देणारी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व प्रलंबित मागण्यांवर मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन वडार समाजाच्या शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे वडार समाजाच्या न्याय्य मागण्यांबाबत आशावाद निर्माण झाला असून पुढील काळात या प्रश्नांवर ठोस निर्णय अपेक्षित असल्याची भावना समाजबांधवांमध्ये व्यक्त होत आहे.

000

close