क्षयरुग्णांना पोषण सहाय्याचे वाटप; तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भागवत दहिफळे यांच्याकडून टीबीबाबत जनजागृती
शनि शिंगणापूर प्रतिनिधी) :-सोनई जिल्हा परिषद आरोग्य केंद्रात क्षयरोगमुक्त समाजाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ‘टीबी मुक्त ग्रामपंचायत’ अभियानांतर्गत क्षयरुग्णांना पोषण सहाय्य वितरण कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनई येथे पार पडला. क्षयरुग्णांना उपचाराच्या काळात योग्य पोषण मिळावे आणि त्यांचे आरोग्य सक्षम राहावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या पशुसंवर्धन व अर्थ बांधकाम विभागाचे सभापती सुनील गडाख यांनी उपलब्ध करून दिलेल्या पोषण सहाय्याचे क्षयरुग्णांना यावेळी वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रजनी शिरसाठ होत्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भागवत दहिफळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनईच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षितिजा इंगळे, डॉ. शिवकुमार सोनटक्के, सामाजिक कार्यकर्ते संदिप अशोकराव कुसळकर, युवा उद्योजक अनिल निमसे, गणेश गडाख, प्रगतशील शेतकरी व ज्येष्ठ पत्रकार अशोक भुसारी, किशोर दरंदले यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. टीबीबाबत गैरसमज दूर करण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भागवत दहिफळे यांनी यावेळी क्षयरोगाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत २६ टीबी बाधित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ९ रुग्ण उपचारानंतर टीबीमुक्त झाले आहेत. उर्वरित रुग्णही नियमित उपचार व औषधोपचार घेत असल्याने लवकरच पूर्णपणे बरे होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.क्षयरोग हा उपचाराने पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. त्यामुळे नागरिकांनी टीबीबाबत भीती किंवा गैरसमज बाळगू नये. शासनाच्या माध्यमातून टीबी बाधित रुग्णांना मोफत उपचार व औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. तसेच रुग्णांच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून दरमहा एक हजार रुपयांची पोषण सहाय्याची रक्कम जमा केली जाते, अशी माहिती डॉ. दहिफळे यांनी दिली.
टीबीची लक्षणे आढळल्यास आजार लपविण्याऐवजी तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी. नियमित औषधोपचार पूर्ण केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे टीबीविषयी जनजागृती वाढविणे आणि रुग्णांना उपचार पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पोषण सहाय्यामुळे रुग्णांना आधार
क्षयरुग्णांच्या उपचारामध्ये औषधोपचाराबरोबरच योग्य आहार व पोषणाला महत्त्व आहे. याच उद्देशाने रुग्णांना पोषण सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांना आर्थिक तसेच पोषणाच्या दृष्टीने आधार मिळणार असून, ‘टीबी मुक्त ग्रामपंचायत’ अभियानाला अधिक बळ मिळणार आहे.
गणेश गडाख आणि डॉ. रजनी शिरसाठ यांनीही क्षयरोग प्रतिबंध, उपचार पद्धती आणि रुग्णांना मिळणाऱ्या शासकीय सुविधांबाबत मार्गदर्शन केले.निरोगी ग्रामपंचायत – क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत’ या संकल्पनेतून सोनई परिसर क्षयरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जिल्हा परिषद अहिल्यानगरचे सभापती सुनील गडाख, सोनई ग्रामपंचायतीचे सरपंच धनंजय वाघ आणि ग्रामविकास अधिकारी प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. बी. पालवे यांनी केले. उपस्थितांचे आभार राजश्री आल्हाट यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
000

