प्रतिनिधी :मोहन शेगर, सोनई
सोनई : येथील आदर्श विद्या मंदिर माध्यमिक विभागात ‘नशामुक्ती अभियान’ अंतर्गत विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. ओम शांती केंद्रातील ब्रह्मकुमारी उषा दीदी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम, चांगल्या सवयी, योग्य वर्तन, मोबाईलचा मर्यादित वापर तसेच निरोगी जीवनशैली याबाबत सखोल मार्गदर्शन केले.यावेळी मार्गदर्शन करताना ब्रह्मकुमारी उषा दीदी यांनी विद्यार्थ्यांनी लहान वयातच व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. तंबाखू, गुटखा, दारू, अमली पदार्थ यांसह शरीरासाठी घातक असलेल्या कोणत्याही पदार्थांचे सेवन टाळणे अत्यंत आवश्यक आहे. व्यसनामुळे केवळ शारीरिक आरोग्यच बिघडत नाही, तर मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावरही त्याचे गंभीर परिणाम होतात, असे त्यांनी सांगितले.चांगल्या सवयी आणि चांगले वर्तन हीच व्यक्तिमत्त्व विकासाची पहिली पायरी आहे,’ असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापराबाबतही जागरूक केले. मोबाईलचा अनावश्यक वापर टाळून अभ्यास, मैदानी खेळ, वाचन, योग, ध्यान आणि सकारात्मक उपक्रमांकडे विद्यार्थ्यांनी वळावे, असा संदेश त्यांनी दिला.योग्य संस्कार, सकारात्मक विचार आणि शिस्तबद्ध जीवनशैली यातूनच उत्तम चारित्र्याची घडण होते, असे सांगून विद्यार्थ्यांनी आपल्या संगतीची निवड काळजीपूर्वक करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. तुवर सर यांनी प्रास्ताविक करून नशामुक्ती अभियानाची गरज आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील संस्कारांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. पी. पवार तसेच शिक्षकवृंद यांच्या वतीने ब्रह्मकुमारी उषा दीदी व त्यांच्या सहकाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर ब्रह्मकुमारी उषा दीदी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांना नशामुक्तीची शपथ दिली. व्यसनमुक्त, निरोगी आणि संस्कारक्षम समाज निर्माण करण्यासाठी आपण स्वतः व्यसनांपासून दूर राहू तसेच इतरांनाही त्यापासून परावृत्त करू, असा संकल्प यावेळी करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती बुधवंत मॅडम यांनी आभार मानले. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नशेचे दुष्परिणाम आणि निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती निर्माण झाली.
०००

