निरा भिमा कारखान्याचे 7 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट -भाग्यश्री पाटील
इंदापूर : प्रतिनिधी दि. 8/8/26
निरा भिमा सहकारी साखर कारखाना आगामी सन 2026-27 च्या 26 व्या ऊस गळीत हंगामामध्ये 7 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. सदर उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी शनिवारी (दि. 8) दिली.
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी गळीत हंगाम सन 2026-27 साठी बसविण्यात येणाऱ्या मिल रोलरचे पूजन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या आगामी गळीत हंगामासाठी मशिनरीची कामे प्रगतीपथावर आहेत. कारखान्याने गेली 25 वर्षात शेतकऱ्यांना नेहमीच चांगला दर दिलेला आहे. आगामी गळीत हंगामात शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी केले.
तसेच चालू वर्षी धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध सर्व क्षेत्रावरती ऊस लागणी कराव्यात व निरा भीमा कारखान्याकडे ऊस नोंद देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही सौ. भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, मोहन गुळवे, तानाजी नाईक, अजिनाथ पाटील, महादेव क्षीरसागर, गोविंद रणवरे, जयकुमार कारंडे, दयानंद गायकवाड, रामचंद्र पाटील, महादेव शेंडगे, रणजित वाघमोडे आदीसह मान्यवर उपस्थित होते. कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ यांनी स्वागत केले.
•चौकट:
चौकट:-
निरा व भिमा नद्यांवरील बंधारे अडविण्याची जबाबदारी निरा भीमा कारखाना घेणार- हर्षवर्धन पाटील
-------------------------------
निरा भिमा कारखान्याकडून कार्यक्षेत्रातील नीरा नदीवरील कळंब ते नीरा नरसिंहपूर पर्यंतचे 13 बंधारे व भिमेवरील भाटनिमगाव, टणु व शेवरे असे 3 बंधारे अडविण्याची जबाबदारी निरा भीमा कारखाना घेणार आहे. यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेशी चर्चा झाली असून, शासनाकडून लवकरच मंजुरी मिळेल. त्याचा कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
•चौकट:-
ऊस शेतीसाठी ए.आय. तंत्रज्ञान वरदान- भाग्यश्री पाटील
------------------------------
ऊस शेतीसाठी ए.आय. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पाणी, खत बचत होऊन उत्पादन खर्चामध्ये मोठी बचत होत असून पिकाच्या उत्पादनामध्ये सुमारे 25 ते 30 टक्के वाढ होत आहे. त्यामुळे ऊस शेतीसाठी वरदान ठरत असलेल्या ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांनी केले.
_____________________________
फोटो:-शहाजीनगर येथील निरा भिमा कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन प्रसंगी हर्षवर्धन पाटील, अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील व इतर.

