शौकतभाई शेख / श्रीरामपूर:
मुलगी जन्माचे स्वागतपर येथील सौ.विमल कृष्णा सरदार व मेजर कृष्णा दलपत सरदार यांची नात तथा सौ.सुषमा संदीप सरदार यांची सुकन्या " ओजस्वी" हिच्या जन्माच्या स्वागतपर औषणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नातमुलीचे आजोबा मेजर कृष्णा दलपत सरदार यांनी आपल्या नातीच्या भावी उज्ज्वल भविष्यासाठी तीच्या नावे पोस्टात "किसान विकास पत्राच्या माध्यमातून एक लाख रुपयांचा धनादेश देऊन शिक्षणास प्रोत्साहन देण्याचा संकल्प करत समाजापूढे एक अनोखा आदर्श निर्माण केला.
याप्रसंगी मुलीच्या आई - वडिलां समवेत महिला नातेवाईकांनी औक्षण व साहेबराव हांडे यांच्या गायन पार्टीच्या सुंदर अशा स्वागत गीताने तसेच टाळ्यांच्या गजरात बाळाचे स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी" बेटी बचाव बेटी पढाव" मुलगी घराची शान आहे अशा घोषणा देत मंचावर येईपर्यंत पुष्पवृष्टी करण्यात आली. मंचावर पोहोचल्यानंतर दोन लहान मुलींकडून पुष्प देऊन बालिकेचे स्वागत करण्यात आले, याप्रसंगी सुंदर असे सूत्रसंचालन करत असताना माजी मुख्याध्यापक श्री.नवनाथ अकोलकर सरांनी मुलीच्या जन्माचे महत्त्व, स्त्री शिक्षण, व समानतेचा संदेश दिला, तर बौद्धाचार्य आण्णासाहेब झीने यांच्या हस्ते मुलीचा नामकरण संस्कार विधी करण्यात आला व बाळाचे नाव "ओजस्वी" असे ठेवण्यात आले
"ओजस"म्हणजे तेज, प्रकाश, सामर्थ्य, ऊर्जा, उत्साह आणि चैतन्य व्यक्तिमत्त्वातील प्रभाव व तेजस्विता बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास म्हणून "ओजस्वी"'म्हणजे तेजस्वी ,ऊर्जावान, सामर्थ्यवान आणि प्रभावी व्यक्ती मत्त्वाची व्यक्ती "ओजस्वी" म्हणजे ज्ञानाचे तेज, कर्तुत्वाची ऊर्जा आणि उज्वल भविष्याची आशा मान्यवरांच्या उपस्थितीत मुलगा मुलगी यांच्यात कोणताही भेदभाव करणार नाही , प्रत्येक मुलीला शिक्षण , सन्मान आणि समान संधी मिळण्यासाठी प्रयत्न करीन, स्त्री भरून हत्या, हुंडा आणि महिला वरील अन्यायाला विरोध करीन, मुलगी वाचवू मुलगी शिकवू, आणि तिचा सन्मान करू अशी सार्वजनिक शपथ घेण्यात आली
यावेळी डी.डी. काचोळे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे, माजी सैनिक संघटनेचे बाळासाहेब बनकर, एकल महिला अशासकीय सदस्य तथा दैनिक लोकमतचे मा.उपसंपादक मिलिंदकुमार साळवे, शंभुक विद्यार्थी वसतीगृह तसेच विद्रोही संघटनेचे अध्यक्ष अशोक दिवे सर यांनी परिवारामध्ये मुलगी किती महत्त्वाची आहे तसेच मुला-मुलीमध्ये भेदभाव करू नये,आज प्रत्येक क्षेत्रात महिला उत्तुंग भरारी घेत आहेत, लेक लक्ष्मीचे रूप आहे, "मुलगी घराचा मान आहे तिच्या हसण्यात भविष्य, तिच्यामुळे उजळतो हिंदुस्तान आहे"असे गौरवोद्गार काढले.
मेजर कृष्णा सरदार यांनी आपल्या नातीच्या नांवे पोस्टात " किसान विकास पत्राच्या" माध्यमातून तीच्या उज्वल भविष्यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश देऊन शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संकल्प केल्याचा मनोगतात भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आजी - माजी सैनिक संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, परिवर्तन फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी, सदस्य, या सुंदर आणि गोड कार्यक्रमासाठी महिला भगीनी सामाजिक बांधिलकी असलेले अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुलाची अपेक्षा ठेवत, मुलगी जन्माला आल्यास आजही सामाजात अनेक जण नाराज होतात, मातेलाच दोष देतात, मुलगाच हवा होता असा अट्टाहास धरतात, परंतु श्रीरामपूर येथील माजी सैनिक (सुभेदार) मेजर कृष्णा दलपत सरदार यांनी आपल्या नातीच्या जन्माचे स्वागतपर सामाजास एक अनोखा संदेश दिला आहे,खरे तर त्याचे अनुकरण सर्वच समाज घटकांत व्हावे, हा उपक्रम समाजासाठी आदर्श असून प्रत्येक गाव- शहरात व कुटुंबात मुलीच्या जन्माचे अशाच प्रकारे उत्साहात स्वागत व्हावे अशी भावना याप्रसंगी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. ओजस्वी चे आजोबा मेजर कृष्णा सरदार यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे आभार व्यक्त केले.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

