shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

१९८५ मध्ये टिटवाळ्याहून आणलेल्या श्री गणेशमूर्तीपासून सुरू झालेली परंपरा आजही अखंडित; ज्येष्ठ पत्रकार संजय महाजन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आरती

१९८५ मध्ये टिटवाळ्याहून आणलेल्या श्री गणेशमूर्तीपासून सुरू झालेली परंपरा आजही अखंडित; ज्येष्ठ पत्रकार संजय महाजन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आरती

शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डी शहरातील ओम साई नगर येथे वैद्य परिवाराने गेल्या ४१ वर्षांपासून अखंडितपणे जपलेल्या श्री गणेशोत्सव परंपरेनिमित्त श्री गणेशाची आरती मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाली. वैद्य परिवाराच्या अनेक पिढ्यांनी श्रद्धेने जोपासलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही नव्या पिढीकडून तितक्याच भक्तिभावाने पुढे नेली जात आहे.
या गणेशोत्सव परंपरेची सुरुवात सन १९८५ मध्ये झाली. शिर्डी येथील स्थानिक रहिवासी प्रदीप वैद्य यांचे काका सोमनाथ वैद्य यांनी सर्वप्रथम टिटवाळा येथून श्री गणेशाची मूर्ती आणली. ही मूर्ती दरवर्षी दहा दिवस स्थापित करून विधिवत पूजा-अर्चा करावी, असा त्यांनी आग्रह धरला. त्यानंतर विश्वनाथ अण्णाजी वैद्य यांनी गणेशमूर्तीची स्थापना करत या धार्मिक परंपरेची मुहूर्तमेढ रोवली.

तेव्हापासून वैद्य परिवाराने ही परंपरा अखंडितपणे जपली आहे. पुढे सुनील वैद्य व प्रदीप वैद्य यांनी मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सवाची धुरा सांभाळली. दरवर्षी श्री गणेशाची विधिवत स्थापना करण्याबरोबरच विविध आकर्षक देखावे व सुंदर आरास साकारून गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली.
काळानुसार ही भक्तीची परंपरा पुढील पिढीकडे आली असून आज विराज वैद्य व जयदीप वैद्य हेही तितक्याच श्रद्धेने श्री गणेशाची सेवा करत आहेत. दरवर्षी गणेशमूर्तीची स्थापना, पूजा-अर्चा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून परिवाराची ४१ वर्षांची परंपरा ते पुढे नेत आहेत.

यंदाच्या या पारंपरिक गणेशोत्सवात श्री गणेशाची आरती करण्याचा मान नानासाहेब शिंदे, ज्येष्ठ पत्रकार संजयजी महाजन, साई श्रद्धा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आसारामजी वारे, ओम साई नगर महिला मंडळ तसेच प्रेरणा वैद्य यांना मिळाला. यावेळी वैद्य परिवारातील सदस्यांसह ओम साई नगरमधील महिला, नागरिक, गणेशभक्त व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

आरतीच्या वेळी गणरायाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. तब्बल चार दशकांहून अधिक काळ एका परिवाराने श्रद्धा, भक्ती आणि सातत्याने जोपासलेली ही गणेशोत्सव परंपरा ओम साई नगरच्या धार्मिक व सांस्कृतिक वारशाचा महत्त्वपूर्ण भाग ठरत असून, नव्या पिढीकडूनही ती तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असल्याने परिसरातून वैद्य परिवाराचे कौतुक होत आहे.
close