मुलींच्या संघाचा प्रथमच सहभाग; १७ वर्षांखालील मुलींचे उपविजेतेपद, पाच संघांना पदके
कोपरगांव / प्रतिनिधी:
सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगांवच्या खेळाडूंनी अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली आहे. सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडी येथे अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय व सोमैया विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध शाळांमधून सुमारे अडीचशे ते तीनशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, या स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळांमध्ये श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंची संख्या सर्वाधिक होती. शारदा स्कूलच्या मुलींच्या टेबल टेनिस संघाने या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथमच सहभाग नोंदवत आपल्या कामगिरीची दमदार सुरुवात केली. पहिल्याच सहभागात मुलींनी उल्लेखनीय यश संपादन केले.
१४ वर्षांखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक, तर १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. तसेच १९ वर्षांखालील मुलींच्या संघानेही तृतीय क्रमांक मिळवत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. मुलांच्या संघानेदेखील स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक, तर १७ वर्षांखालील मुलांच्या संघानेही तृतीय क्रमांक मिळवला.
अशा प्रकारे शारदा स्कूलच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत चार तृतीय क्रमांक, एक उपविजेतेपद आणि मुला-मुलींच्या संघांच्या उत्कृष्ट कामगिरीसह आपली वेगळी ओळख निर्माण केली. विशेषतः मुलींच्या संघाचा हा पहिलाच जिल्हास्तरीय सहभाग असल्याने या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
शारदा स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रोत्साहन देण्यात येत असून, खेळाडूंना सरावासाठी आवश्यक सुविधा, मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक वातावरण उपलब्ध करून दिले जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून विविध क्रीडा प्रकारांमध्ये शारदा स्कूलचे विद्यार्थी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. के. एल. वाकचौरे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही खेळाडूंचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
“मैदानावरची प्रत्येक लढत ही विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देणारी असते. शारदा स्कूलच्या खेळाडूंनी मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे, सातत्याचे आणि संघभावनेचे फलित आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

