shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भातुकलीच्या खेळातली राजा-राणी, अर्ध्यावर डाव मोडला... एक अधुरी कहाणी कै. अलकाताई भाऊसाहेब ढूस

आज हा लेख लिहिताना हात थरथरत आहेत, डोळ्यात अश्रू आहेत. कारण हा केवळ एक लेख नाही, तर ४६ वर्षांच्या एका निस्वार्थ प्रेमकहाणीचा शेवट आहे.

गुहा गावच्या मातीत, एकनाथ कोळसे यांच्या कुटुंबात एका चिमुकलीचा जन्म झाला - अलका... बालपण फार सुखाचे नव्हते.. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपले.. आईने काबाडकष्ट करून, स्वतःच्या घामाने अलकाला वाढवले. गरिबी होती, पण.., संस्कार श्रीमंत होते. जेमतेम ७ वी पर्यंत अलकाचे शिक्षण झाले, पण.. जीवनाच्या शाळेने तिला खूप काही शिकवले.

आणि मग.. नियतीने आमचे पुतणे भाऊसाहेब सोबत त्यांची भेट घडवून आणली. गुहा येथील भाऊसाहेब ची आत्या साखरबाई उऱ्हे यांच्या माध्यमातून भाऊसाहेब ढूस यांच्याशी अलकाची एका लग्न समारंभात ओळख झाली... ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.. अलकाचे वय कमी असल्याने लग्नासाठी दोघांना दोन वर्षे वाट पाहावी लागली. अखेर.. १९८३ साली दोन जीव एक झाले. लग्न झाले.. आणि, अलकाच्या आयुष्यातील खरा संघर्ष सुरू झाला.

भाऊसाहेबांची सोसायटीतली कमी पगाराची नोकरी. त्या तुटपुंज्या पगारात संसाराचा गाडा ओढणे सोपे नव्हते. पण.. अलकाने कधी तक्रार केली नाही. ती भाऊसाहेबांच्या मागे सावलीसारखी उभी राहिली.

संसार फुलला.. पहिली लेक रेखा झाली, दुसरी सुरेखा झाली.. आणि, मुलगा जगदीश झाला. तीन अपत्ये, आणि त्यांचे शिक्षण, त्यांची लग्ने... प्रत्येक वळणावर अलकाने कंबर कसली. कधी शेती केली, कधी गायीचा जोडधंदा केला, कधी उन्हात राबली, पण मुलांना कमी पडू दिले नाही.

देवाने तिच्या कष्टाचे चीज केले. राजेंद्र साबळे (तांदुळनेर) आणि विजय गायकवाड (ब्राम्हणी) हे सोन्यासारखे दोन जावई मिळाले. ऐन कोरोना काळात मुलगा जगदीशचे लग्न झाले. सून म्हणून प्रियांका आली - इंजिनिअर. तिचे उरलेले शिक्षणही अलकाने आणि भाऊसाहेबांनी स्वतःच्या कष्टाने पूर्ण केले.

मुलगा जगदीश आणि सून प्रियांका पुण्यात इंजिनिअर म्हणून स्थिरावले. आणि मग आयुष्यात गोड काळ आला. अडीच वर्षाची नात कु. दक्षता... जिला सात महिन्याची असल्यापासून अलकाने कुशीत वाढवले. तिच्या बोबड्या बोलात अलकाला तिच्या आयुष्याचे सार्थक दिसत होते.

सगळं छान चाललं होतं. दुःखाचे दिवस संपून सुखाची पहाट उगवली होती. पण नियतीला हे सुख पाहवले नाही.

*दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी काळाने घाला घातला.*

ज्या हातांनी आयुष्यभर कुटुंबाला सावरले, ज्या हातांनी लेकरांना घडवले, तेच हात कायमचे विसावले.

भाऊसाहेबांसाठी तर हा आघात काळजाचा तुकडा निघून जाण्यासारखा आहे. १९८३ पासून ते आजपर्यंत... सुखात-दुःखात, उन्हा-पावसात जी सावलीसारखी सोबत होती, ती सावलीच आज हरपली.

खरंच,
*भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी,*
*अर्ध्यावरती डाव मोडला,*
*अधुरी एक कहाणी...*

अलकाताई गेल्या नाहीत, त्या आमच्या आठवणीत, त्यांच्या संस्कारात, नात - दक्षताच्या हसण्यात सदैव जिवंत राहतील.

त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

*शब्दांकन: आप्पासाहेब भिमराज ढूस ९८२३०३५९३६
close