संजय भिंगारदिवे यांचा सेवापूर्ती निमित्त मखदुम सोसायटी तर्फे सन्मान
अहिल्यानगर / प्रतिनिधी:
शासकीय सेवा म्हणजे केवळ नोकरी नसते, तर ती जनतेप्रती असलेली एक महत्त्वाची जबाबदारी असते. वर्षानुवर्षे आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून काम करणे, कार्यालयीन जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडणे आणि सहकाऱ्यांशी आपुलकीचे संबंध निर्माण करणे ही मोठी गोष्ट आहे.
संजय भिंगारदिवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात विभागीय भांडारपाल म्हणून आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडली. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आपल्या कामाला नेहमीच प्राधान्य दिले. सहकाऱ्यांना मदत करण्याची वृत्ती आणि सर्वांशी जिव्हाळ्याने वागण्याची पद्धत यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले.
आज सेवापूर्ती होत असताना कार्यालयीन जबाबदाऱ्यांमधून ते मुक्त होत आहेत, मात्र त्यांनी कमावलेला स्नेह, विश्वास आणि माणुसकीचे नाते कधीही निवृत्त होणार नाही.
निवृत्ती म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे. उलट हा आयुष्याच्या एका सुंदर नव्या अध्यायाचा प्रारंभ असतो. आतापर्यंतच्या धावपळीच्या जीवनातून आता स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि आवडीनिवडींसाठी अधिक वेळ देण्याची संधी त्यांना मिळणार आहे.असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय शायरा डॉ. कमर सुरूर यांनी केले.
सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगर येथे विभागीय भांडारपाल म्हणून ३० वर्षे उल्लेखनीय सेवा बजावलेले संजय गणपत भिंगारदिवे यांच्या सेवापूर्ती व वाढदिवसा निमित्त विशेष समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, सहकारी व मित्रपरिवाराच्या वतीने संजय भिंगारदिवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा मखदुम सोसायटी तर्फे डॉ. कमर सुरूर व आबीद खान यांनी व अनेक सामाजिक संस्था, मित्र परिवार व कार्यालयाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. शासकीय सेवेत कार्यरत असताना त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने पार पाडत सहकाऱ्यांशी आपुलकीचे संबंध जपले. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचा आणि कार्यातील शिस्तीचा अनेकांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.
शासकीय सेवेत अनेक वर्षे काम करताना मिळालेला अनुभव, सहकाऱ्यांचे प्रेम आणि समाजाशी जोडलेले नाते हीच त्यांच्या पुढील आयुष्यातील मोठी शिदोरी असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
यावेळी संजय भिंगारदिवे यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि यशासाठी शुभेच्छा दिल्या.
समारंभाच्या निमित्ताने सहकाऱ्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले होते. दीर्घकाळ एकत्र काम केलेल्या सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद
खान - 9860477869
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

