shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून मिळणार वाहतुकीच्या नियमांचे धडे ; खडांबे येथील श्रीशाहू विद्यालयाचा राज्यात पायलट प्रोजेक्ट ठरणार...

श्री शाहू विद्यालयात ‘वाहतूक नियम व रस्ता सुरक्षा’ प्रात्यक्षिक ट्रॅकचा शुभारंभ..

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे 
रविवार दिनांक ०४  ऑक्टोबर २०२६


रस्ता सुरक्षेसाठी शालेय जीवनापासूनच जनजागृती; ‘जय जवान, जय किसान’ शिल्पाचे अनावरण...
राहुरी - ( खडांबे) : रस्ते अपघात टाळण्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी, या उद्देशाने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री शाहू विद्यामंदिर, खडांबे ता. राहुरी विद्यालयाच्या वतीने ‘वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षा प्रात्यक्षिक ट्रॅक (मार्ग साधना)’ उभारण्यात आला आहे. या प्रात्यक्षिक ट्रॅकचा शुभारंभ राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख व नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
          अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे विश्‍वस्त जयवंतराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला.यावेळी कृषी भूषण सूरसिंगराव पवार,माजी सभापती बाळासाहेब लटके, माजी सरपंच यशवंतराव ताकटे,आबासाहेब वाघमारे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष तथा माजी उपसरपंच प्रभाकर हरिश्‍चंद्रे, प्रगतशील शेतकरी संजय पवार, स्कोडन लीडर कोंडीराम कल्हापुरे,आहारतज्ज्ञ नानासाहेब हरिश्चंद्रे,अर्जुन लटके,बाळासाहेब जठार, तानाजी पवार,गुलाब पवार, अंशबापू आवारे,रावसाहेब पवार,विद्यालयाचे प्राचार्य आप्पासाहेब शिंदे,पर्यवेक्षक दिलीप भोरुंडे, शिक्षक गणेश कुऱ्हे, जाधव सर, तसेच रावसाहेब खेडकर,लक्ष्मण हरिश्‍चंद्रे,विशाल पारख,नानासाहेब भवार, सुखीशेठ गुगळे, उंडे नर्सरी चे सर्वेसर्वा अशोकराव उंडे आदींसह विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
         रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच वाहतूक नियमांबाबत जागृती निर्माण व्हावी, यासाठी प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देण्याचा उपक्रम विद्यालयाने हाती घेतला आहे. यासाठी शाळेच्या परिसरात वाहतूक नियम व रस्ता सुरक्षा प्रात्यक्षिक ट्रॅक उभारण्यात आला असून,या ट्रॅकवर वाहनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वाहनात बसवून रस्त्यावर दिसणारी विविध चिन्हे,वाहतूक सिग्नल, किलोमीटरचे अंतर तसेच रस्त्यालगतची गावे यांची माहिती प्रत्यक्ष कृतीद्वारे दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता वाहतूक नियमांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.

‘जय जवान, जय किसान’ शिल्पाचे अनावरण...!!
सदर कार्यक्रमप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते भारतीय जवान व शेतकऱ्यांचा सन्मान वाढविणाऱ्या ‘जय जवान, जय किसान’ शिल्पाचे अनावरण करण्यात आले. या शिल्पामध्ये बैलगाडी आणि त्यामागे प्रगतशील शेतकऱ्याचे चित्र रेखाटण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय जवानाचे चित्रही साकारण्यात आले असून, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये शेतकरी व जवानांविषयी सन्मानाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    
शाहू विद्यालयातून शिकलेला विद्यार्थी भविष्यात वाहतुकीचे नियम मोडणार नाही- प्राचार्य आप्पासाहेब शिंदे..!!
    प्रास्ताविकात विद्यालयाचे प्राचार्य आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, आपल्या श्री शाहू विद्यालयातून शिकलेला विद्यार्थी भविष्यात कधीही वाहतुकीचे नियम मोडणार नाही, स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालणार नाही यासाठी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे धडे दिले जाणार आहेत.सर्वाधिक मृत्यू रस्ते अपघातांमुळे होतात. योग्य वाहतूक नियमांची माहिती असल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. मोपेड व बॅटरीच्या गाड्या आल्याने लहान मुलांच्या हातातही लवकर वाहने येत आहेत.त्यामुळे त्यांना वाहतुकीचे नियम माहिती असणे गरजेचे झाले आहे. ‘जय जवान, जय किसान’ शिल्पाच्या माध्यमातून शेतकरी व जवानांचा सन्मान वाढविण्यात येणार आहे. शेती करूनही मोठे व्यावसायिक होता येते. त्यामुळे शेतीला कमी समजू नये. देशसेवेसाठीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.शाळेत पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञान दिले जाते. समाजात मुलांना उभे करण्याचे काम विद्यालयाच्या माध्यमातून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक गणेश वारुळे म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे धडे देणारा हा राज्यातील पायलट प्रोजेक्ट ठरणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरूकता निर्माण होणार आहे. रस्त्यावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना मदत करा. जीव वाचवण्यासाठी वेळेवर मदत मिळणे आवश्‍यक असते. यासाठी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सध्या सायबर क्राईमच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार होत असून, याबाबत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरोघरी जागृती होणे गरजेचे आहे. मोबाईलचा चांगला उपयोग तसेच त्याचे दुष्परिणाम याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

दररोज अपघातांमध्ये अनेकांचे जीव जातात , म्हणूनच सामाजिक भान  ठेवून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जान ही एक देशसेवाच-पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख..!!

पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख म्हणाले की, दररोज अपघातांमध्ये अनेकांचे जीव जात आहेत. भारतीय संस्कृतीचे भान ठेवून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. १०८ व ११२ क्रमांक डायल करून रुग्णवाहिका बोलवावी. समाजासाठी अशा प्रकारचे उपक्रम गरजेचे आहेत. चांगल्या सवयी आयुष्य बदलू शकतात. परवाना मिळत नाही तोपर्यंत वाहने चालवू नका, असे आवाहन त्यांनी केले. या विद्यालयात मॉडेल पोलीस स्टेशन उभारल्यास पोलिसांचे कार्यही विद्यार्थ्यांना समजू शकणार आहे. यातून चांगले पोलीस अधिकारीही घडतील.यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

 विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात - अध्यक्ष जयवंतराव वाघ..!!
   वाहतूक नियम हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. अचानक अपघात घडतात. त्यासाठी वाहतूक नियम पाळणे आवश्‍यक आहे. लहान वयातच वाहतुकीच्या नियमांची माहिती झाल्यास भविष्यातील अपघात टाळता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्यक्षम शिक्षणाची गरज-  कृषी भूषण सूरसिंगराव पवार..!! 

      पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्यक्षम शिक्षणाची गरज आहे. देशात युवकांची संख्या सर्वाधिक आहे. युवकांना कौशल्यक्षम शिक्षणाचे धडे मिळाल्यास देशाची विकासात्मक दिशेने वाटचाल होणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे शिक्षण सुरक्षिततेसाठी गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब लटके व बाळासाहेब जठार यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यालयाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम कोरडे यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक दिलीप भोरुंडे यांनी मानले.
close