shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेटफळ तलावासाठी शेतकऱ्यांचा एल्गार ; २ ऑक्टोबरला बावडा-वालचंदनगर चौकात रास्ता रोकोचा इशारा

शेटफळ तलावासाठी शेतकऱ्यांचा एल्गार ; २ ऑक्टोबरला बावडा-वालचंदनगर चौकात रास्ता रोकोचा इशारा
इंदापूर : शेटफळ तलाव लाभक्षेत्रातील दहा गावांमध्ये गेल्या चार महिन्यांपासून आवर्तन बंद असल्याने माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. भाटघर-वीर धरणे दोन ते तीन वेळा ओव्हरफ्लो होऊन नीरा नदीत पाणी सोडण्यात आले; मात्र शेटफळ तलावात पाणी सोडण्यात न आल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने नीरा डावा कालव्यातून तलावात पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी संघर्ष समिती व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.
    मागणीची पूर्तता झाली नाही तर शुक्रवारी ( दि.२ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजता बावडा-वालचंदनगर चौकात संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसे निवेदन तहसीलदार जीवन बनसोडे यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.
    निवेदनावर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, प्रशांत पाटील, उदयसिंह पाटील, मनोज पाटील, दत्तात्रय घोगरे, अनिल पाटील, पवनराजे घोगरे, रंजीत गिरमे, विकास पाटील, किरण पाटील, दादासो घोगरे, सुरेश मेहेर, सुधीर पाटील, प्रसाद पाटील, स्वप्नील खोबरे, नितीन शिंदे, अरुण पवार, विष्णू कोरटकर, अमोल घोगरे, संतोष पाटील व इतरांच्या सह्या आहेत. 
    शेटफळ हवेली तलावाच्या लाभक्षेत्रात बावडा, शेटफळ हवेली, भोडणी, वकीलवस्ती, सुरवड, पिठेवाडी, निरनिमगाव, कचरवाडी (बा.), सराटी आणि लाखेवाडी या दहा गावांचा समावेश आहे. या गावांतील सुमारे ५० हजार नागरिकांसह मोठ्या संख्येने पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न उग्र बनला आहे. गेल्या सुमारे ११५ वर्षांपासून पावसाळ्यात भाटघर-वीर धरणातील पाण्याने शेटफळ तलाव भरून घेण्याची पद्धत आहे. यंदा भाटघर-वीर धरणे भरून वाहिली. नीरा नदीत पाणी सोडण्यात आले. मात्र उपलब्ध पाण्यातून शेटफळ तलाव भरून घेण्यात आला नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे असे शेतकरी संघर्ष समिती व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वीर-भाटघर धरणातील उपलब्ध पाण्याच्या टक्केवारीनुसार शेटफळ तलाव भरून द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
   जलसंपदा विभागाचे अधिकारी तलाव भरून देण्याचे वारंवार आश्वासन देत आहेत; मात्र प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. ‘आश्वासन नको, तलावात पाणी सोडा,’ अशी भूमिका घेत तातडीने आवर्तन सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. पाणीटंचाई आणखी तीव्र झाल्यास शासनाला गावोगावी टँकर व जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची वेळ येईल,अशी शक्यता सादर केलेल्या निवेदनात व्यक्त
करण्यात आली आहे.
    या पार्श्वभूमीवर तातडीने नीरा डावा कालव्यातून तलावात पाणी सोडावे अशी मागणी करण्यात आली आहे. ती मान्य न झाल्यास २ ऑक्टोबरला रास्ता रोको करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सुप्रिया सुळे, पुणे जिल्हाधिकारी, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता, निमगाव केतकी उपविभागाचे उपअभियंता, तहसीलदार व पोलिस प्रशासनाला निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

close