शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचे जलसंपदामंत्र्यांचे लेखी आदेश- हर्षवर्धन पाटील
-वीर धरणातून शेटफळसाठी आज मंगळवारी पाणी सोडले
इंदापूर : प्रतिनिधी दि.29/9/26
इंदापूर तालुक्यातील शेटफळ तलाव लाभक्षेत्रातील 10 गावांमध्ये गेली 5 महिन्यांपासून आवर्तन सोडले नसल्याने विदारक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वीर धरणातून शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचे लेखी आदेश जलसंपदा मंत्री ( कृष्णा खोरे ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंत संजीव चोपडे यांना दिले आहेत. त्यानुसार वीर धरणातून शेटफळ तलावासाठी आजच मंगळवारी (दि. 29) पाणी सोडण्यात आले असून, सदरचे पाणी उद्या बुधवारी शेटफळ तलावामध्ये पोहचणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि. 29) दिली.
शेटफळ तलाव लाभ क्षेत्रामध्ये दुष्काळामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने तलावामध्ये पाणी सोडणे संदर्भात मंत्रालयामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदामध्ये विखे पाटील यांची आज मंगळवारी भेट घेतली. यावेळी लाभक्षेत्रातील दहा ग्रामपंचायतींचे जनावरांना हिरव्या चाऱ्यासाठी व पिण्याचे पाण्यासाठी पाणी सोडणे संदर्भातील ठराव व निवेदन हर्षवर्धन पाटील यांनी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. त्यानुसार जलसंपदा मंत्र्यांनी जलसंपदा विभागाला आजच पाणी सोडण्याचे लेखी आदेश दिले.
तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व जलसंपदाचे अधिकारी हे निरा डावा कालव्यावर पाठवून पाणी हे शेटफळ तलावामध्ये पोहोचविण्याचे नियोजन करण्याचे आदेशही यावेळी ना.विखे पाटील यांनी जलसंपदा विभागास दिले आहेत. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पाणी तलावामध्ये पोहोचणे संदर्भात प्रसंगी पोलीस बंदोबस्त देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. शेटफळ तलावामध्ये पाणी येणार असल्याने क्षेत्रातील दहा गावांमधील जनावरांच्या चाऱ्याचा माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
शेटफळ तलावामध्ये पाणी सोडणे संदर्भात कृषिमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांचेशी चर्चा झाली. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र गुड्डी, पुणे पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे,अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे व कार्यकारी अभियंता दिंगबर डुबल आदि जलसंपदाच्या आधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचेही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी नमूद केले.
वीर धरणाचा व्हॉल्व हा सोमवारी रात्री निरा डावा कालव्याचे आवर्तन संपल्याने बंद करण्यात आलेला होता. मात्र शेटफळ धरणामध्ये पाणी सोडण्याचे जलसंपदा मंत्र्याचा आदेश आल्याने व्हॉल्व हा मंगळवारी दुपारी उघडण्यात येऊन पाणी थेट शेटफळ तलावात पोहचणार असल्याने लाभक्षेत्रामधील 10 गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
__________________________
फोटो:-मुंबईत शेटफळ तलावात पाणी सोडणे संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मंगळवारी भेट घेतली.

