शेटफळ तलावात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांकडून आभार; नियोजित ‘रस्ता रोको’ आंदोलन तात्पुरते रद्द.
इंदापूर :
शेटफळ तलावात पाणी सोडण्याची मागणी मान्य होऊन तलावात पाणी दाखल झाल्याने शेटफळ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी शासनाचे आभार मानले आहेत. या मागणीसाठी नियोजित करण्यात आलेले ‘रस्ता रोको’ आंदोलन तात्पुरते रद्द करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
शेटफळ लाभक्षेत्रातील दहा गावांतील शेतकरी व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले होते.
शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याची मागणी मान्य झाल्यानंतर तलावात पाणी दाखल झाले आहे. तसेच पिकांच्या सिंचनासाठी आवर्तन देण्याची मागणीही मान्य झाल्याचे शेतकरी संघर्ष समितीने पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आंदोलनाचा मार्ग न स्वीकारता शासनाच्या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विशेष प्रयत्न केले त्याबद्दल 10 गावातील शेतकरी व शेतकरी संघर्ष समिती वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
पाणीपुरवठा अचानक बंद केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा
दरम्यान, तलावातील पाण्याचा विसर्ग कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अचानक बंद करण्यात आल्यास लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वतीने पुन्हा तीव्र स्वरूपाचे ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
“शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागावा आणि पाण्याचे आवर्तन सुरळीत मिळावे,” अशी अपेक्षा शेतकरी संघर्ष समितीने व्यक्त केली आहे.
सदर पत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन चेके, निरा डावा कालवा पाटबंधारे उपविभाग निमगाव शाखा अधिकारी व्ही. व्ही. गायकवाड यांच्याकडे उदयसिंह पाटील, मनोज पाटील, पवनराजे घोगरे, रणजीत गिरमे यांनी शेतकरी संघर्ष समिती, शेटफळ लाभक्षेत्रातील दहा गावांच्या वतीने दिले.
---------------
चौकट: , दि. 30 सप्टेंबर 2026 रोजी शेटफळ तलाव भरावयासाठी पाणी सोडण्यात आले असून, दि. 1 ऑक्टोबर रोजी तलावामध्ये पाणी सुरू आहे. पुढील 10 दिवसांच्या कालावधीत तलाव 50 टक्के भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तलाव भरल्यानंतर जनावरांच्या चाऱ्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने .नियोजित रास्ता रोको आंदोलन स्थगित करावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन निरा डावा कालवा पाटबंधारे उपविभागाकडून करण्यात आले आहे.
------------------
फोटो ओळ : रोको’ आंदोलन तात्पुरते रद्द करण्यात आल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली.

