shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उजनी धरणातून भीमा नदीत तातडीने पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणीभीमा नदी कोरडी पडल्याने शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; भीमा नदी बचाव समितीचे कृषिमंत्र्यांना निवेदन

उजनी धरणातून भीमा नदीत तातडीने पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी

भीमा नदी कोरडी पडल्याने शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; भीमा नदी बचाव समितीचे कृषिमंत्र्यांना निवेदन
बावडा, ता. इंदापूर : उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. भीमा नदीपात्रात पाणी नसल्याने शेतीच्या नियोजनावर परिणाम होत असून पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी भीमा नदी बचाव समिती आणि भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर अशोक मगर ,तुकाराम घोगरे, ज्ञानदेव बागल, महादेव शिंदे, सुरेश शिंदे यांनी केले आहेत.

उजनी धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही भीमा नदी कोरडी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. पावसाळ्याच्या काळातही नदीपात्रात पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर शेती कशी करावी, जनावरांची तहान कशी भागवावी आणि पिके कशी जगवावीत, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. नदीच्या पाण्यावर शेतीचे संपूर्ण नियोजन अवलंबून असल्याने पाणीटंचाईचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकरी संकटात सापडले असून त्यांच्यावर गंभीर परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

उजनी धरणातून भीमा नदीमध्ये तातडीने पाणी सोडण्यात यावे, भीमा नदीकाठच्या शेतीसाठी आवश्यक पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे, शेतकऱ्यांना नियमित पाणी उपलब्ध होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात आणि नदीत पाणी सोडण्याबाबत संबंधित विभागाने स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

या प्रश्नावर कृषिमंत्र्यांनी संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार पाणी सोडण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा भीमा नदी बचाव समिती व भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी त्यांना मिळावे आणि भीमा नदी पुन्हा प्रवाहित व्हावी, हीच आमची प्रमुख मागणी आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

इंदापूर येथे येथून दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी हे निवेदन कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांना देण्यात आले.
------------------------
फोटो ओळ: भीमा नदी बचाव समिती आणि भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी.
close