कीर्तन, संतपूजन, सत्संग आणि भजनाने रंगणार भक्तीचा सोहळा; मध्यरात्री दूध अमृताच्या महाप्रसादाचे वाटप!
शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह | विशेष प्रतिनिधी
श्रीरामपूर : सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने व गुरुवर्य स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान ट्रस्ट, भामानगर, भामाठाण (ता. श्रीरामपूर) येथे रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भक्तिमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
चंद्राच्या शीतल प्रकाशात नामस्मरणाचा गजर, संतवाणीचा अमृतवर्षाव आणि भक्तीचा जागर अशा मंगलमय वातावरणात हा उत्सव साजरा होणार असून, परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
या सोहळ्यानिमित्त दुपारी ४ ते ६ या वेळेत कुरणपूर येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. बाळकृष्ण महाराज पारखे यांची कीर्तनसेवा होणार आहे. त्यानंतर रात्री ९ ते १२ या वेळेत सत्संग व भजनाचा कार्यक्रम रंगणार असून, मध्यरात्री १२ वाजता कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून भाविकांना दूध अमृताचा महाप्रसाद वितरित करण्यात येणार आहे.
कार्यक्रमातील महाप्रसादाची सेवा श्री. बाबासाहेब गणपत टेमकर (मेंढी, भालगाव, ता. गंगापूर) यांच्या वतीने करण्यात येणार असून, संतपूजनाचा मान श्री. शामराव देठे पाटील (कुरणपूर) यांना लाभणार आहे.
गुरुकुल आणि अन्नदानाच्या सेवाकार्याला हातभार लावण्याचे आवाहन!
श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथे धार्मिक उपक्रमांबरोबरच गुरुकुल व अन्नदानाचे सेवाकार्य अविरत सुरू आहे. या पवित्र कार्याच्या विस्तारासाठी तसेच संस्थानच्या विकासकामांसाठी दानशूर व्यक्ती व भाविकांनी तन-मन-धनाने सहकार्य करावे. इच्छुकांनी वस्तू अथवा रोख स्वरूपात मदत करण्यासाठी थेट संस्थानशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांनी येताना दूध व साखर सोबत आणावी, अशी नम्र विनंती आयोजकांनी केली आहे.
कार्यक्रमस्थळ : श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान ट्रस्ट, भामानगर, मु. पो. भामाठाण, ता. श्रीरामपूर.
अधिक माहितीसाठी संपर्क :
स्वामीजी : ९९२१७७३००५
संस्थान मॅनेजर : ७५८८६०५३०५ / ७०२०९०२४७०
चला, कोजागिरीच्या चांदण्यात भक्तीचा दीप उजळूया... सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन सेवा, सत्संग आणि नामस्मरणाचा आनंद लुटूया!

