shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/

About Me

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन
कळंब : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब (ता. इंदापूर) येथे थोर समाजसुधारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह (भैय्या) रणसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि समतेच्या लढ्याचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी तसेच बहुजन समाज आणि महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महात्मा फुले यांनी केलेले कार्य क्रांतिकारी असून, त्यांचे विचार आजही समाजाला दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय असून, पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन स्त्री शिक्षणाच्या चळवळीला नवी दिशा दिली. त्यांचे विचार आणि कार्य भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहतील, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण केले.
close